Indian Student Murder in USA: अमेरिकेतील टेक्सास राज्यातील डल्लास शहरात एका 28 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्याकरण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका गॅस स्टेशनवर पार्ट-टाईम काम करत असताना एका अनोळखी हल्लेखोराने चंद्रशेखर पोले (या विद्यार्थ्यावर गोळीबार केला, ज्यात त्याचा मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, याच शहरात अवघ्या एका महिन्यापूर्वी एका दुसऱ्या भारतीय व्यक्तीची क्रूरपणे हत्याकरण्यात आली होती.
उच्च शिक्षणासाठी गेला होता अमेरिका
हैदराबादचा (Hyderabad) रहिवासी असलेला चंद्रशेखर पोले हा 2023 पासून उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता. भारतात त्याने डेंटल सर्जरीची पदवी पूर्ण केली होती. त्याने नुकतेच अमेरिकेतील मास्टर्सचे शिक्षण पूर्ण केले होते आणि पूर्णवेळ नोकरीच्या शोधात असताना तो गॅस स्टेशनवर पार्ट-टाईम काम करत होता.
पार्थिव आणण्यासाठी कुटुंबाची सरकारकडे मागणी
पुत्राच्या निधनाने दुखात बुडालेल्या चंद्रशेखरच्या कुटुंबीयांनी त्याचे पार्थिव भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. बीआरएस पक्षाचे आमदारआणि तेलंगणाचे माजी मंत्री टी हरीश राव यांनी कुटुंबीयांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.
हरीश राव आणि दुसरे बीआरएस आमदार सुधीर रेड्डी यांनी हैदराबादमधील चंद्रशेखरच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. “ज्या मुलावर विश्वास ठेवून पालकांना वाटले होते की तो खूप मोठी भरारी घेईल, तो आता जगात नाही, हे दुःख पाहणे हृदयद्रावक आहे. बीआरएसच्या वतीने आम्ही राज्य सरकारकडे त्वरित पुढाकार घेऊन चंद्रशेखरचे पार्थिव त्याच्या मूळ गावी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करतो,” असे राव यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.
डल्लासमध्ये भारतीयांवरील वाढते गुन्हे
डल्लासमध्ये भारतीयांविरुद्धच्या गुन्ह्यांची ही दुसरी मोठी घटना आहे. गेल्या महिन्यात चंद्र मौली ‘बॉब’ नागमालय्या या 50 वर्षीय भारतीय वंशाच्या मोटेल व्यवस्थापकाची त्याच्या पत्नी आणि मुलासमोर हत्या करण्यात आली होती. एका तुटलेल्या वॉशिंग मशीनवरून झालेल्या वादानंतर ही घटना घडली होती.
हे देखील वाचा – RBI चा मोठा निर्णय! आता प्रत्येक बँकेत ‘हे’ खाते अनिवार्य; ‘झिरो बॅलन्स’सह मिळणार अनेक मोफत सुविधा