IndiGo Flight Cancellation : गेल्या तीन दिवसांपासून इंडिगोच्या (IndiGo) विमानसेवांमध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. या पार्श्वभूमीवर, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पीटर एल्बर्स यांनी पहिले निवेदन जारी केले.
या अडचणींची त्यांनी कबुली दिली असून, विमानसेवा पूर्णपणे सामान्य होण्यास 10 दिवसांपर्यंतचा काळ लागू शकतो, असे स्पष्ट केले आहे. सरकारी यंत्रणांनी सोमवारपर्यंत सेवा पूर्ववत होतील, अशी अपेक्षा व्यक्त केल्यानंतर काही तासांतच हे CEO चे निवेदन आले आहे.
एकाच दिवशी 1,000 उड्डाणे रद्द
एल्बर्स यांनी माहिती दिली की, 5 डिसेंबर (शुक्रवार) हा दिवस एअरलाइनसाठी (Airline) सर्वात जास्त अडचणीचा ठरला. या दिवशी देशभरात 1,000 हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली, जी इंडिगोच्या एकूण दैनंदिन विमानांपैकी अर्ध्याहून अधिक होती. संपूर्ण ऑपरेशनल प्रणाली पुन्हा सुरू केल्यामुळे हा मोठा व्यत्यय निर्माण झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
CEO यांनी प्रवाशांना आवाहन केले आहे की, ज्यांची उड्डाणे रद्द झाली आहेत, त्यांनी विमानतळावर येऊन आणखी गैरसोय करून घेऊ नये. ते म्हणाले, “या विलंबांमुळे किंवा उड्डाणे रद्द झाल्यामुळे आमच्या अनेक ग्राहकांना झालेल्या मोठ्या गैरसोयीबद्दल इंडिगोच्या वतीने मी मनापासून माफी मागतो.”
सामान्य सेवा कधीपर्यंत?
पीटर एल्बर्स यांनी स्पष्ट केले की, “संपूर्ण स्थिती सुधारण्यासाठी 5 ते 10 दिवस लागतील, तर 10 ते 15 डिसेंबर या काळात सेवा हळूहळू सामान्य होण्यास सुरुवात होईल. प्रवाशांना त्यांच्या उड्डाणांचे ताजे अपडेट्स तपासत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.” कंपनीने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे आणि शनिवारपासून रद्द होणाऱ्या उड्डाणांची संख्या 1,000 च्या खाली येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सरकारी हस्तक्षेप आणि कृती योजना
इंडिगोने ग्राहकांच्या मदतीसाठी तीन टप्प्यांत कृती योजना तयार केली आहे. यात संदेशांद्वारे माहिती देणे आणि ग्राहक समर्थन कर्मचारी वाढवणे यांचा समावेश आहे. दरम्यान, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने या सेवा व्यत्ययाची उच्च-स्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, DGCA ने देखील काही अंमलबजावणीमध्ये सवलत दिल्याने इंडिगोला मदत झाली आहे. CEO एल्बर्स यांनी DGCA आणि मंत्रालयाच्या समन्वयाने पुढील काळात स्थिर सुधारणा अपेक्षित असल्याचे सांगितले आहे.









