Indore police raid IAS officer farmhouse gambling : मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात एका वरिष्ठ महिला आयएएस अधिकाऱ्याच्या फार्महाऊसवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. राज्याच्या वित्त विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक वंदना वैद्य आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या फार्महाऊसवर सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून १८ जणांना ताब्यात घेतले आहे.
मध्यरात्री पोलिसांचा धडक छापा
जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ५० किमी अंतरावर असलेल्या आवलीपुरा गावातील फार्महाऊसवर जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारेपोलिसांनी ही कारवाई केली. फार्महाऊसचा मुख्य दरवाजा बाहेरून बंद होता, मात्र आतमध्ये मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू होता. या छाप्यात पोलिसांनी १८ जणांना पकडले, तर सहा जण पळून जाण्यात यशस्वी झाले.
कारवाईत जप्त केलेला मुद्देमाल:
- रोकड: १३.६८ लाख रुपये रोख.
- मोबाईल: ३० महागडे मोबाईल फोन.
- साहित्य: पत्त्यांचे कॅट आणि इतर जुगाराचे साहित्य.
पोलीस अधिकारी निलंबित
या प्रकरणानंतर मानपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, संबंधित बीटचे उपनिरीक्षक आणि एका सहाय्यक उपनिरीक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. फार्महाऊसचा केअरटेकर रणजित चौधरी आणि जुगाराचा मुख्य आयोजक जगदीश राठोड ऊर्फ कुबडा हे घटनास्थळावरून पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या सर्वांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयएएस अधिकाऱ्याची बाजू
फार्महाऊसवर छापा पडल्यानंतर आयएएस वंदना वैद्य यांनी पोलिसांना पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे. काही अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या कुटुंबाच्या फार्महाऊसवर बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच फार्महाऊसवर चोरी झाल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला असून, घुसखोरी करणाऱ्यांविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
ग्रामीण पोलीस अधीक्षक यांगचेन डोलकर भुतिया यांनी सांगितले की, वंदना वैद्य यांच्या तक्रारीची चौकशी केली जाईल आणि ते लोक फार्महाऊसमध्ये नेमके कसे शिरले याचा तपास केला जाईल.











