Iran Israel War: इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा फटका आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीला बसला असून, दुबईमध्ये महाराष्ट्रातील शेकडो पर्यटक अडकून पडले आहेत. या संकटकाळात परदेशात असलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी ‘IPF MahaHelpline’ सक्रिय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही सेवा सुरू झाल्याच्या पहिल्या २४ तासांतच तब्बल १२00 हून अधिक प्रवाशांनी मदतीसाठी साद घातली आहे.
२४ तास मदतीचा ओघ: काय आहे ही यंत्रणा?
महाराष्ट्र सरकारच्या मान्यतेने चालवली जाणारी ही हेल्पलाईन (+971 50 365 4357) दुबईतील ५ महत्त्वाच्या शहरांमध्ये कार्यरत आहे. २० स्वयंसेवकांचे पथक अहोरात्र राबून प्रवाशांना खालील सुविधा पुरवत आहे:
- निवास आणि भोजन: ज्या पर्यटकांचा हॉटेल मुक्काम संपला आहे, त्यांच्यासाठी मुदतवाढ किंवा तात्पुरती निवासाची सोय करणे.
- औषधोपचार: ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांसाठी स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक औषधे उपलब्ध करून देणे.
- वाहतूक: विमानतळावर जाण्यासाठी किंवा पर्यायी प्रवासासाठी वाहनांची व्यवस्था करणे.
सरकारचे थेट लक्ष आणि दूतावासाशी समन्वय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे या संपूर्ण परिस्थितीवर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवून आहेत. दुबईतील भारतीय दूतावास आणि कॉन्सुल जनरल यांच्याशी प्रशासन सतत संपर्कात आहे. इंडिगो, एअर इंडिया आणि स्पाइसजेट यांसारख्या कंपन्यांची उड्डाणे रद्द झाल्याने ४०० प्रवाशांची विशेष यादी तयार करण्यात आली आहे. या प्रवाशांना उपलब्ध होणाऱ्या पहिल्याच फ्लाईट्समध्ये प्राधान्य मिळावे, यासाठी विमान कंपन्यांकडे पाठपुरावा केला जात आहे.
५०० हून अधिक प्रवासी मायदेशी परतले
हेल्पलाईनच्या प्रभावी कामामुळे २ ते ६ मार्च दरम्यान दुबई आणि ओमानमधील मस्कत येथून ५०० पेक्षा जास्त मराठी प्रवासी सुखरूप भारतात परतले आहेत. जे प्रवासी अजूनही तिथे आहेत, विशेषतः लहान मुले आणि वृद्ध, त्यांच्यासाठी ‘MahaHelpline’ चे पथक विशेष खबरदारी घेत आहे. मस्कत आणि फुजैराह सारख्या पर्यायी केंद्रांवरून प्रवाशांना भारतात पाठवण्यासाठी चार्टर ऑपरेटर्सचीही मदत घेतली जात आहे.
वाढत्या हवाई निर्बंधांमुळे निर्माण झालेली ही स्थिती निवळण्यासाठी अजून काही दिवस लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत महाराष्ट्र शासन आणि हेल्पलाईनचे पथक दुबईतील भारतीय दूतावासाच्या सहकार्याने प्रत्येक मराठी प्रवाशाला सुरक्षित घरी आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.










