Home / देश-विदेश / IPL 2026 : आज लखनौचा पहिला सामना रंगणार दिल्लीविरुद्ध; कर्णधार ऋषभ पंतची कसोटी

IPL 2026 : आज लखनौचा पहिला सामना रंगणार दिल्लीविरुद्ध; कर्णधार ऋषभ पंतची कसोटी

IPL 2026 : आयपीएल २०२६ हंगामाच्या पाचव्या दिवशी लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन बलाढ्य संघांचा सामना रंगणार...

By: Team Navakal
IPL 2026
Social + WhatsApp CTA

IPL 2026 : आयपीएल २०२६ हंगामाच्या पाचव्या दिवशी लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन बलाढ्य संघांचा सामना रंगणार आहे.लखनौ येथील एकाना क्रिकेट मैदानावर सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास हा सामना खेळवला जाणार आहे.

लखनौ संघासाठी यावर्षीचा हंगाम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. संघाचा कर्णधार ऋषभ पंत याच्यावर विशेष लक्ष असणार आहे. गेल्या हंगामात तो ना फलंदाज म्हणून प्रभाव टाकू शकला, ना कर्णधार म्हणून संघाला यश मिळवून देऊ शकला. त्यातच अनेक प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे बाहेर असल्याने संघाचे संतुलन बिघडले होते. त्यामुळे यावर्षी पंतसाठी ही स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी आहे. लखनौचा संघ यावेळी अधिक मजबूत आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि दक्षिण आफ्रिकेचा एनरिक नॉर्टजे यांचा समावेश झाल्याने गोलंदाजीला चांगली धार आली आहे.

गेल्या काही काळापासून दुखापतींनी त्रस्त असलेला मयंक यादव आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून त्याच्याकडून वेगवान आणि प्रभावी गोलंदाजीची अपेक्षा आहे. मोहसिन खान देखील पुनरागमन करत आहे, तर तरुण खेळाडू प्रिन्स यादवने सराव सत्रात चांगली छाप पाडली. फिरकी गोलंदाज दिग्वेश राठीही संघासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

फलंदाजीच्या आघाडीवर मिचेल मार्श आणि एडन मार्कराम ही जोडी संघाला भक्कम सुरुवात करून देण्याची जबाबदारी सांभाळणार आहे. कर्णधार पंत वरच्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. ज्यामुळे संघाला वेगवान धावा मिळण्याची अपेक्षा आहे. त्याच्यानंतर निकोलस पूरन हा फलंदाजी करणार आहे.
दुसरीकडे, दिल्लीचा संघही संतुलित आणि मजबूत आहे. सलामीला के. एल. राहुल उतरणार हे जवळपास निश्चित आहे तरी त्याचा जोडीदार कोण असेल याबाबत अजून स्पष्टता नाही. पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल किंवा श्रीलंकेचा पथुम निस्संका हे संघाचे पर्याय आहेत. मधल्या फळीत डेव्हिड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्स यांसारखे आक्रमक फलंदाज असल्याने दिल्लीची फलंदाजीही भक्कम आहे.

गोलंदाजीच्या बाबतीत दिल्लीकडे फिरकी गोलंदाज अक्षर पटेल आणि कुलदीप यादव हे दोन प्रभावी पर्याय आहेत, जे सामन्याचा निकाल बदलण्याची क्षमता ठेवतात. वेगवान गोलंदाजांमध्ये लुंगी एनगिडी आणि टी. नटराजन हे संघाला चांगली साथ देतील. जरी मिचेल स्टार्क दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात खेळणार नाही तरी दिल्लीची गोलंदाजी तगडी मानली जात आहे.

मागील हंगामात प्लेऑफमध्ये स्थान न मिळाल्याने लखनौ संघ अधिक निर्धाराने मैदानात उतरणार आहे. कर्णधार ऋषभ पंत आणि मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्या मार्गदर्शनाखाली संघ नव्या जोमाने आणि नव्या रणनीतीसह खेळणार आहे. पहिल्याच सामन्यात विजय मिळवून आत्मविश्वास वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या