Iran-America: : इराणने तेलाच्या वाहतुकीसाठी होर्मुजची सामुद्रधुनी बंद केल्यानंतर या सामुद्रधुनीतून तेल वाहतूक करणार्या जहाजांना संरक्षण देऊ, अशी घोषणा अमेरिकेने केली होती. परंतु इराणने या अरुंद समुद्री मार्गाच्या तळाशी मोठ्या प्रमाणावर भूसुरुंग पेरले आहेत. हे घातक सुरुंग शोधून नष्ट करण्यासाठी किमान 30 दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे आता या मार्गावरून जाणार्या कोणत्याही जहाजाला सुरक्षा देण्यास अमेरिकेने असमर्थता दर्शवली आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे व्यापारी जहाजांमध्ये भीतीचे वातावरण असून, शेकडो जहाजे समुद्रात अडकली आहेत. त्यामुळे तेलाच्या किमतीचा मोठा भडका उडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे युद्ध संपवण्यासाठी इराणने तीन अटी घातल्या आहेत. आपल्या हक्कांना मान्यता, युद्धामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आणि भविष्यात पुन्हा हल्ले होणार नाहीत यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ठोस हमी यांचा त्यात समावेश आहे. इराणच्या या ताठर भूमिकेमुळे युद्ध लवकर संपण्याची शक्यता नाही.
इराणने होर्मुजमधून एक थेंबही तेल बाहेर जाऊ दिले जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे होर्मुजमधून सध्या तेल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या मार्गावरून वाहतूक करणार्या जहाजांवर इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्डकडून हल्ले केले जात आहेत. त्यात अनेक जहाजांचे नुकसान झाले आहे आणि काही जहाजांवरील कर्मचार्यांना जीवही गमवावा लागला आहे. कालच गुजरातमधील कांडला बंदराच्या दिशेने येत असलेल्या मयुरी नारी या थायलंडच्या कार्गो जहाजावर हल्ला करण्यात आला. या जहाजावर तैनात असलेले दोन भारतीय नागरिक या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले. आज होर्मुजच्या खाडीत आणखी दोन जहाजांवर हल्ले झाल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्या तरी होर्मुजमधून वाहतूक करण्यास जहाजे धजावत नसतानाच इराणने होर्मुज सामुद्रधुनीत पेरलेल्या भूसुरुंगांची माहिती बाहेर आली आहे. अमेरिकेने होर्मुजमध्ये असे सुरूंग पेरणार्या इराणच्या 16 माइनलेयर (नौका) नष्ट केल्या आहेत. परंतु इराणने अनेक सुरूंग समुद्राच्या तळाशी पेरल्याची भीती आहे. 100 ते 500 किलोंचे हे सुरूंग जहाजाच्या आवाजाने सक्रिय होतात. या संहारक सुरुंगापुढे जगातील सर्वात शक्तिशाली मानल्या जाणार्या अमेरिकन नौदलाने एक पाऊल मागे घेतले आहे. हे सुरुंग शोधून नष्ट केले जात नाहीत, तोपर्यंत अमेरिकन नौदल जहाजांना संरक्षण कवच पुरवणार नाही. त्यामुळे होर्मुजची सामुद्रधुनी आणखी महिनाभर बंद राहण्याची शक्यता आहे. तसे झाले तर कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 150 डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो. इराणने आधीच असा इशारा दिला आहे की, युद्ध आणखी चिघळल्यास हा दर 200 डॉलर्सपर्यंत जाण्याची भीती आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केंटकीतील हेब्रॉन येथे एका रॅलीला संबोधित करताना अमेरिकेच्या विजयाचा पुनरूच्चार केला. ते म्हणाले की, अमेरिकेने युद्ध जिंकले आहे. इराणमध्ये हल्ला करण्यासारखे ठिकाणच राहिलेले नाही. खरे तर अमेरिकन सैन्याने आधीच विजय मिळवला आहे. परंतु वॉशिंग्टन अकाली माघार घेणार नाही. खूप लवकर जिंकलो असे म्हणणे मला आवडत नाही, पण पहिल्या तासातच सर्व काही संपले होते. यावेळी डोनाल्ड ट्रम्प चक्क स्टेजवर डान्स करतानाही दिसले. इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेशकियन यांनी ट्रम्प यांचा हा दावा खोडून काढला. ते म्हणाले की, इराण शांततेसाठी वचनबद्ध आहे. परंतु अमेरिका आणि इस्रायल यांनी या मागण्या मान्य केल्याशिवाय युद्ध संपणार नाही. झायोनिस्ट शासन आणि अमेरिकेमुळे पेटलेले हे युद्ध संपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे इराणच्या वैध हक्कांची मान्यता. युद्धातील नुकसानीची भरपाई आणि भविष्यातील आक्रमणांविरुद्ध ठोस आंतरराष्ट्रीय हमी. हा संघर्ष अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे सुरू झाला. आता ठोस हमी मिळाल्याशिवाय इराण युद्धविराम स्वीकारणार नाही.
दरम्यान, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने इराणविरुद्ध एक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर केला. बहारिनने मांडलेल्या या ठरावात इराण आपल्या शेजारी देशांवर करत असलेले क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले त्वरित थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 15 सदस्यांपैकी 13 देशांनी या ठरावाच्या बाजूने मतदान केले. चीन आणि रशिया हे दोन देश मतदानावेळी गैरहजर राहिले. सध्या या परिषदेचे अध्यक्षपद अमेरिकेकडे आहे. या प्रस्तावाला भारतानेही पाठिंबा दिला आहे. भारतासह ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जपान, पाकिस्तान, सौदी अरेबिया, ब्रिटन आणि अमेरिका असे एकूण 135 देश या प्रस्तावाचे सह-प्रायोजक आहेत. विशेष म्हणजे, इराणचा जवळचा मित्र मानल्या जाणार्या पाकिस्ताननेही या ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने जागतिक स्तरावर चर्चा रंगली आहे. इराणने या ठरावाचा निषेध केला असून, हा सुरक्षा परिषदेचा ‘उघड गैरवापर’ असल्याचे म्हटले आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने तेहरानवर केलेल्या हल्ल्याकडे जग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप इराणने केला आहे.
भारतीय जहाजांना
होर्मुजमधून परवानगी?
युद्धाच्या धामधुमीत इराणने भारताला दिलासा देत आज भारतीय जहाजांना होर्मुजच्या सामुद्रधुनीतून वाहतूक करण्यास मुभा दिल्याचे सांगण्यात आले. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघाची यांच्यात या संदर्भात दूरध्वनीवर चर्चा झाली. या चर्चेनंतर इराणने भारतीय तेल टँकरना होर्मुज सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग देण्यास सहमती दर्शवली, असे म्हटले जात होते. मात्र नंतर इराणने भारताला अशी कुठलीही सवलत दिली नसल्याचे वृत्त नंतर प्रसिद्ध झाले. विशेष म्हणजे, ‘शेनलाँग सुएझमॅक्स’ हे कच्च्या तेलाने भरलेले जहाज आज आखातातून सुरक्षितपणे मुंबईत दाखल झाले आहे. सौदी अरेबियातील रास तनुरा बंदरातून कच्चे तेल घेऊन निघालेल्या या जहाजाला इराणने होर्मुज सामुद्रधुनीतून जाण्यासाठी विशेष परवानगी दिली. त्यानंतर जहाजाने अरुंद सागरी मार्ग सुरक्षितपणे पार करत मुंबई गाठली, असे म्हटले जात होते. परंतु इराणकडून त्याचे कुठलेही समर्थन करण्यात आले नाही. सध्या इराणने केवळ चीनच्या जहाजांना होर्मुजमधून वाहतूक करण्यास परवानगी दिलेली आहे.











