Iran and India : इराण आणि अमेरिकेत समझोता होण्याची चिन्हे दिसत नसताना भारतासाठी एक दिलासादायक घडामोड झाली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले की, आम्ही भारतासह चीन, रशिया, इराक आणि पाकिस्तान या पाच मित्र देशांच्या जहाजांना होर्मुज सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली आहे. मध्य पूर्वेतील युद्धामुळे तेलपुरवठ्यावर परिणाम होत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे होर्मुज सामुद्रधुनीतून भारताच्या अडकून पडलेल्या सुमारे 22 जहाजांसाठी हा मार्ग खुला झाला आहे. कच्च्या तेलाच्या या जहाजांचा भारताकडे येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे भारतावरील तेल आणि गॅस टंचाईचे संकट लवकरच दूर होण्याची चिन्ह दिसत आहेत.
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी इराणी राज्य टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, होर्मुज सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केलेली नाही. इराणशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या पाच देशांच्या जहाजांना तेथून सुरक्षित मार्ग दिला जात आहे. अनेक जहाजमालक किंवा संबंधित देशांनी आमच्याशी संपर्क साधून सुरक्षित मार्ग देण्याची विनंती केली आहे. काही मित्रदेशांसाठी किंवा इतर कारणांमुळे आमच्या सशस्त्र दलांनी त्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिला आहे. चीन, रशिया, पाकिस्तान, इराक आणि भारत या देशांची जहाजे या मार्गातून काही दिवसांपूर्वी गेली. इतर काही देश, अगदी बांगलादेशसुद्धा, आमच्याशी समन्वय साधत आहे. भविष्यातही, युद्धानंतरसुद्धा हे सुरू राहील. अमेरिका, इस्रायल तसेच मध्य पूर्वेतील संघर्षात सहभागी असलेल्या खाडी देशांच्या जहाजांना या मार्गातून जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. आम्ही युद्धस्थितीत आहोत. हा संपूर्ण प्रदेश युद्धक्षेत्र आहे. आमच्या शत्रूंच्या आणि त्यांच्या सहयोगी देशांच्या जहाजांना मार्ग देण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र इतरांसाठी हा मार्ग खुला आहे. त्यांनी जवळपास पाच दशकांनंतर होर्मुज सामुद्रधुनीवर इराणने मिळवलेल्या नियंत्रणाबद्दल समाधान व्यक्त करताना म्हणाले की, जगातील अनेकांना वाटले की. इराणकडे अशी कृती करण्याचे धैर्य नाही. पण आम्ही ते करून दाखवले. त्यांनी आम्हाला थांबवण्यासाठी सर्व प्रयत्न केले, इतर देशांकडे मदत मागितली, पण कोणीही प्रतिसाद दिला नाही. कारण ते शक्य नव्हते.
इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांच्या संयुक्त लष्करी कारवाईनंतर काही दिवसांनी, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी होर्मुज सामुद्रधुनी अंशतः बंद केल्याची घोषणा केली. या निर्णयामुळे जागतिक ऊर्जा संकट निर्माण झाले. कारण जगातील सुमारे 20% तेल आणि द्रवरूप नैसर्गिक वायू एलएनजी या मार्गातून वाहतूक केला जातो. या नाकेबंदीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तेल आणि वायूच्या किमतीत वाढ झाली आणि अनेक देशांवर त्याचा परिणाम झाला.
भारतावरही याचा मोठा परिणाम झाला. कारण भारत सुमारे 90% एलपीजी आयात या मार्गातून करतो. त्यामुळे एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला, ज्याचा परिणाम रस्त्यावरील विक्रेत्यांपासून ते रेस्टॉरंट व्यावसायिकांपर्यंत अनेकांवर झाला. मात्र काही आठवड्यांत परिस्थिती सुधारली. होर्मुजमध्ये अडकलेली ‘नंदा देवी’ आणि ‘शिवालिक’ यांसारखी जहाजे, ज्यामध्ये एलपीजी होता, त्यांना मार्ग देण्यात आला. ही जहाजे काही आठवड्यांपूर्वी भारतात पोहोचली. रशियानेही चीनकडे जाणारी जहाजे भारताकडे वळवली होती.











