Iran Crisis: इराणमध्ये ढासळत्या आर्थिक परिस्थितीमुळे पेटलेल्या सरकारविरोधी आंदोलनांनी आता रौद्र रूप धारण केले आहे. आंदोलकांविरुद्ध सरकारने केलेल्या कडक कारवाईत आतापर्यंत सुमारे 2,000 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती एका सुरक्षा अधिकाऱ्याच्या हवाल्याने व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या 3 वर्षांतील इराण सरकारसमोरील हे सर्वात मोठे अंतर्गत आव्हान मानले जात आहे.
हिंसाचार आणि इंटरनेटवर बंदी
गेल्या आठवड्याभरात आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या संघर्षाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये गोळीबार, पेटवलेली वाहने आणि इमारतींचे विदारक दृश्य दिसत आहे. मानवी हक्क संघटनांनी दावा केला आहे की शेकडो लोक मारले गेले असून हजारो आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.
इराण सरकारने माहितीचा ओघ रोखण्यासाठी संपूर्ण देशात इंटरनेट सेवा खंडित केली आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आंदोलकांविरुद्ध इराणच्या फिर्यादींनी पहिले आरोपपत्र दाखल केल्याचे सरकारी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
इराणचा अमेरिका आणि इस्रायलवर आरोप
इराणमधील या अशांततेसाठी तिथल्या सत्ताधाऱ्यांनी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरले आहे. “दहशतवाद्यांनी या आंदोलनांचा ताबा घेतला असून शत्रू देश इराणमध्ये अस्थिरता निर्माण करत आहेत,” असा आरोप इराणने केला आहे. गेल्या वर्षी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या लष्करी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय दबाव आधीच वाढलेला असताना ही नवीन परिस्थिती उद्भवली आहे.
अमेरिकेची लष्करी तयारी आणि इराणचा इशारा
दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणमधील हस्तक्षेपासाठी विविध पर्यायांचा विचार करत आहेत. ट्रम्प यांना लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून सायबर ऑपरेशन्सपर्यंतच्या लष्करी पर्यायांची माहिती देण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी म्हटले आहे की, “इराण कोणत्याही अमेरिकन कारवाईला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या हल्ल्यांच्या तुलनेत आमची तयारी आता कितीतरी पटीने जास्त आहे.”
इराणमधील ही अंतर्गत धुमश्चक्री आणि जागतिक महासत्तांमधील वाढता तणाव यामुळे आखाती देशांमध्ये युद्धाचे ढग दाटले आहेत.









