Iran reward for US fighter pilot capture F-15E crash : मध्यपूर्वेतील युद्ध आता अधिक भीषण वळणावर पोहोचले असून इराणने अमेरिकेचे F-15E लढाऊ विमान पाडल्याचा खळबळजनक दावा केला आहे. नैऋत्य इराणमधील एका प्रांताच्या राज्यपालांनी घोषणा केली आहे की, जो कोणी या विमानातील अमेरिकन वैमानिकाला जिवंत पकडेल किंवा ठार करेल, त्याला सरकारकडून मोठे बक्षीस आणि सन्मान दिला जाईल.
वैमानिकाला पकडण्यासाठी इनामाची घोषणा
इराणी सरकारी चॅनेलवरून प्रसारित केलेल्या संदेशात सांगण्यात आले आहे की, “जर शत्रूचा वैमानिक जिवंत पकडून लष्कराच्या ताब्यात दिला, तर तुम्हाला मोठे नुकसान भरपाई आणि बक्षीस दिले जाईल.” इतकेच नाही तर, आकाशात कोणतेही अमेरिकन विमान किंवा हेलिकॉप्टर दिसल्यास त्यावर हल्ला करण्याचे आवाहनही इराणने आपल्या नागरिकांना केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान पाडल्यानंतर वैमानिकाने विमानातून उडी घेतली असून तो सध्या इराणच्या भूभागात कुठेतरी असण्याची शक्यता आहे. अमेरिकन अधिकारी देखील या वैमानिकाला वाचवण्यासाठी ‘कॉम्बॅट सर्च अँड रेस्क्यू’ ऑपरेशन राबवत आहेत.
युद्धातील विमानांचे नुकसान
तेहरानपासून सुमारे 500 किलोमीटर नैऋत्येला असलेल्या डोंगराळ भागात हे विमान कोसळल्याचे बोलले जात आहे. इराणच्या सोशल मीडियावरून काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले असून, त्यात पिकअप ट्रकवर विमानाचे अवशेष लादलेले दिसत आहेत.
यापूर्वी इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) असाही दावा केला होता की, त्यांनी मध्य इराणमध्ये अमेरिकेचे दुसरे F-35 लढाऊ विमान प्रगत हवाई संरक्षण प्रणालीद्वारे पाडले आहे. हे विमान अमेरिकेच्या लेकनहीथ स्क्वॉड्रनचे असल्याचे सांगण्यात आले आहे. या अपघातात विमान पूर्णपणे नष्ट झाले असून वैमानिकाला बाहेर पडण्याची संधी मिळाली नसावी, असा दावा इराणने केला आहे.
जर इराणचे हे दावे खरे असतील, तर युद्धाच्या सुरुवातीपासून इराणच्या हद्दीत अमेरिकन विमानांचे झालेले हे पहिले मोठे नुकसान मानले जात आहे.









