Strait of Hormuz Oil Toll: अमेरिकेसोबत झालेल्या 14 दिवसांच्या तात्पुरत्या युद्धविरामानंतरही इराणने जागतिक तेल व्यापारावर आपले नियंत्रण मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री मार्गांपैकी एक असलेल्या ‘हॉर्मुझच्या सामुद्रधुनी’तून जाणाऱ्या तेलवाहू जहाजांवर इराण आता १ डॉलर प्रति बॅरल इतका ‘टोल’ आकारण्याच्या तयारीत आहे. ‘रिपोर्टनुसार, हा कर केवळ डिजिटल चलनात (Cryptocurrency) स्वीकारला जाईल.
काय आहे इराणची नवी रणनीती?
इराणच्या ‘ऑईल, गॅस अँड पेट्रोकेमिकल प्रॉडक्ट्स एक्सपोर्टर्स युनियन’ने दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावर देखरेख ठेवण्याचा इराणचा मानस आहे.
- कार्गो तपासणी: जहाजांना त्यांच्या मालाचा तपशील ईमेलद्वारे द्यावा लागेल. शस्त्रसाठा वाहून नेला जात नाही याची खात्री करण्यासाठी इराण प्रत्येक जहाजाची तपासणी करेल.
- क्रिप्टो पेमेंट: जहाजांवरील तेलाच्या प्रमाणानुसार १ डॉलर प्रति बॅरल शुल्क मोजावे लागेल. यासाठी बिटकॉइनसारख्या चलनांचा वापर बंधनकारक असेल.
- वेळेची मर्यादा: शुल्क भरण्यासाठी जहाजांना अत्यंत कमी वेळ दिला जाईल.
‘परवानगीशिवाय प्रवेश नाही’
इराणने आखाती समुद्रातील जहाजांना रेडिओ संदेशाद्वारे कडक इशारा दिला आहे. “परवानगीशिवाय कोणत्याही जहाजाने या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न केला, तर ते नष्ट केले जाईल,” अशी उघड धमकी देण्यात आली आहे. या भीतीमुळे अनेक जहाजांनी आपला प्रवास थांबवला असून, या समुद्री मार्गाचे रूपांतर आता एका मोठ्या ‘पार्किंग’मध्ये झाले आहे.
जागतिक बाजारपेठेवर परिणाम
सध्या सुमारे ४०० जहाजे आखाती देशांत अडकलेली आहेत. कोट्यवधी बॅरल कच्च्या तेलाचा पुरवठा थांबल्याने जागतिक बाजारपेठेत चिंतेचे वातावरण आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामासाठी ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ सुरक्षितपणे खुली करणे ही मुख्य अट ठेवली होती. मात्र, इराणच्या या नवीन प्रस्तावामुळे वाटाघाटी अधिक क्लिष्ट होण्याची शक्यता आहे.
ओमानचा प्रस्तावाला विरोध
इराण आणि ओमान मिळून हे शुल्क आकारतील, अशी चर्चा होती. मात्र, ओमानने याला स्पष्ट विरोध केला आहे. सध्याच्या आंतरराष्ट्रीय करारांनुसार अशा प्रकारे जहाजांवर शुल्क आकारण्याची तरतूद नाही, असे ओमानने ठामपणे सांगितले आहे.









