US-Iran War : अमेरिका आणि इराण दरम्यान सुरू असलेला भीषण संघर्ष थांबवण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडे 15 कलमी शांतता प्रस्ताव पाठवला होता, मात्र इराणने तो पूर्णपणे फेटाळून लावला आहे.
इराणच्या राजनैतिक सूत्रांनी या प्रस्तावाचे वर्णन “अत्यंत अवास्तव” असे केले असून, तो कागदावरही स्वीकारार्ह नसल्याचे म्हटले आहे. जवळजवळ एक महिना चाललेल्या या युद्धामुळे मध्य पूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे.
काय होता अमेरिकेचा प्रस्ताव?
पाकिस्तानच्या मध्यस्थीने इराणपर्यंत पोहोचवण्यात आलेल्या अमेरिकेच्या या 15 कलमी प्रस्तावात अनेक कडक अटींचा समावेश होता:
- इराणच्या अणू कार्यक्रमावर मर्यादा घालणे.
- क्षेपणास्त्र चाचण्या आणि निर्मिती थांबवणे.
- विविध सशस्त्र गटांना इराणकडून मिळणारा पाठिंबा बंद करणे.
- हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा व्यापारासाठी खुली करणे. या बदल्यात अमेरिकेने इराणवरील काही निर्बंध हटवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, इराणच्या मते हा प्रस्ताव फसवणूक करणारा आहे.
इराणच्या 5 प्रमुख अटी
अमेरिकेचा प्रस्ताव फेटाळताना इराणने स्वतःचा 5 कलमी प्लॅन मांडला आहे. इराणने स्पष्ट केले की, जोपर्यंत त्यांच्या अटी पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत ते युद्ध थांबवणार नाहीत. इराणच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
- इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हत्या थांबवणे.
- भविष्यात इराणवर पुन्हा युद्ध होणार नाही याची खात्री देणे.
- युद्धामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणे.
- सर्व प्रकारच्या शत्रुत्वाचा शेवट करणे.
- हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे सार्वभौमत्व मान्य करणे.
मध्यस्थीसाठी पाकिस्तान आणि इजिप्तची धावपळ
या युद्धात पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत आहे. पाकिस्तानचे इराणशी व्यापारी संबंध आहेत, तर सौदी अरेबियाशी संरक्षण करार. तसेच पाकिस्तानी लष्करी नेतृत्वाचे ट्रम्प यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे पाकिस्तानात दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची प्रत्यक्ष भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. इजिप्त आणि तुर्की देखील या चर्चेसाठी यजमानपद भूषवण्यास तयार आहेत.
मैदानातील सद्यस्थिती
एकीकडे शांततेच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे युद्ध थांबण्याची चिन्हे नाहीत. इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर हवाई हल्ले केले आहेत, तर अमेरिकेने या भागात अधिक नौसैनिक तैनात केले आहेत. प्रत्युत्तर म्हणून इराणने कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला केला असून तिथे मोठी आग लागल्याचे वृत्त आहे.











