IRCTC Ticket Booking Rules: भारतीय रेल्वने 1 ऑक्टोबर, 2025 पासून तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक महत्त्वाचा बदल लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, आता IRCTC च्या वेबसाइट किंवा ॲपवरून जनरल आरक्षित तिकीट बुक करण्यासाठी सुरुवातीच्या 15 मिनिटांसाठी आधार आधारित ऑथेंटिकेशन (प्रमाणीकरण) अनिवार्य असणार आहे.
एजेंटला आळा घालून सर्वसामान्य प्रवाशांना तिकीट मिळवून देण्यासाठी हा उपाय करण्यात आल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. याआधी तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार व्हेरिफिकेशन अनिवार्य करण्यात आले आहे.
काय आहे नवा नियम?
नवीन नियमानुसार, जनरल आरक्षित तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांत केवळ आधार पडताळणी झालेले युजर्सच तिकीट बुक करू शकतील. या नियमाचा उद्देश हा आहे की, ज्या प्रवाशांना खरोखरच तिकीटाची गरज आहे, त्यांना त्याचा फायदा मिळावा आणि अनधिकृत व्यक्तींकडून होणारा गैरवापर थांबवता यावा.
रेल्वेने सांगितले आहे की, रेल्वेच्या कम्प्यूटराइज्ड PRS काउंटरवरून तिकीट बुकिंगच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. तसेच, अधिकृत रेल्वे तिकीट एजंटसाठी पहिल्या 10 मिनिटांच्या बुकिंगवरील निर्बंध पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहेत.
तात्काळ तिकिटासाठी नियम आधीच लागू
हा नवा नियम तात्काळ तिकीट बुकिंगसाठी लागू केलेल्या नियमासारखाच आहे. 1 जुलै, 2025 पासून तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार प्रमाणीकरण आधीच अनिवार्य करण्यात आले आहे. तात्काळ तिकिटासाठी, अधिकृत एजंट पहिल्या 30 मिनिटांसाठी बुकिंग करू शकत नाहीत. यामध्ये AC क्लाससाठी सकाळी 10.00 ते 10.30 आणि नॉन-AC क्लाससाठी सकाळी 11.00 ते 11.30 अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे.
हे देखील वाचा – अमेरिकेत TikTok वरची बंदी टळणार; ट्रम्प यांचा चीनसोबत महत्त्वाचा करार; भारतात काय होणार?