Iran-Israel conflict | इराणवर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केल्यानंतर इस्रायलने जगभरातील आपले दूतावास तात्पुरते बंद केले आहेत. इस्रायली दूतावासांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध झालेल्या निवेदनात नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि सार्वजनिक ठिकाणी ज्यू किंवा इस्रायली चिन्हे प्रदर्शित न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
या निवेदनानुसार, इस्रायल आता दूतावासांमार्फत कोणत्याही प्रकारच्या वाणिज्य दूतावास सेवा पुरवणार नाही. तसेच, शत्रुत्वाच्या कारवायांचा सामना करावा लागल्यास नागरिकांनी स्थानिक सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. दूतावास किती काळ बंद राहतील, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
इस्रायलने इराणमधील अणु सुविधा आणि क्षेपणास्त्र कारखान्यांवर हल्ले केल्याचे जाहीर केले होते. इराणला अणुबॉम्ब निर्मितीपासून रोखण्यासाठी इस्रायलने ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ नावान दीर्घकालीन लष्करी मोहीम सुरू केली असून, यात अनेक इराणी लष्करी कमांडर ठार झाले आहेत. इस्रायलच्या या कारवाईमुळे मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढला आहे.
इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने देखील तेल अवीव, जेरुसलेमसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यांचा धोका लक्षात घेऊनइस्रायलने जगभरातील आपले दूतावास तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेची भूमिका आणि इराणला इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यांबाबत प्रतिक्रिया देताना इराणने अमेरिकेच्या अणुकराराच्या मागण्यांना विरोध केल्यामुळेच ही वेळ आल्याचे म्हटले आहे. त्यांनी इराणला करार करण्याचे आवाहन करताना पुढील हल्ले अधिक तीव्र असतील, असा इशाराही दिला आहे. या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंता व्यक्त होत असून, मध्य पूर्वेतील परिस्थिती आणखी गुंतागुंतीची बनली आहे.
इस्त्रालयचे ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ काय आहे?
इस्रायली पंतप्रधानांनी घोषित केलेल्या या ऑपरेशनचा उद्देश इस्रायलच्या अस्तित्वाला इराणपासून असलेला धोका दूर करणे हा होता. नेतन्याहू म्हणाले की, या ऑपरेशनचे लक्ष्य इराणच्या अणु पायाभूत सुविधा, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कारखाने आणि लष्करी क्षमतांवर हल्ला करणे आहे.
“आम्ही हे धोके पुढील पिढीसाठी सोडू शकत नाही,” असे नेतन्याहू म्हणाले, “कारण जर आपण आता कृती केली नाही, तर दुसरी पिढीच नसेल. जर आपण आता कृती केली नाही, तर आपण इथे असणार नाही.” इराणने सहा वर्षांत 20,000 क्षेपणास्त्रे तयार करण्याची योजना आखल्यामुळे, इस्रायल ती नष्ट करण्यासाठी काम करत आहे, असे नेतन्याहू यांनी ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ची माहिती देताना सांगितले.
इस्रायली लष्करानुसार, ही फक्त हल्ल्यांची पहिली पायरी होती. सुरुवातीच्या हल्ल्यांमध्ये इराणच्या विविध भागांमधील अणु लक्ष्यांसह डझनभर लष्करी लक्ष्यांवर हल्ले समाविष्ट होते.
दरम्यान, संयुक्त राष्ट्रांमधील इस्रायलचे राजदूत डॅनी डॅनॉन म्हणाले की, इस्रायलने ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ इराणच्या अणु आणि क्षेपणास्त्र पायाभूत सुविधांविरुद्ध सुरू केले आहे, ज्याचा उद्देश इस्रायलच्या नागरिकांसाठी आणि संपूर्ण जगासाठी असलेल्या तात्काळ आणि अस्तित्वाच्या धोक्याला दूर करणे आहे.