Two Israel embassy staffers shot dead in Washington | अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये कॅपिटल ज्यूइश म्युझियम बाहेर इस्रायली दूतावासातील (Israeli Embassy) दोन कर्मचाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना थेट एफबीआयच्या वॉशिंग्टन फील्ड ऑफिसपासून काहीच अंतरावर घडल्याने संपूर्ण शहरातील ज्यू समुदाय आणि राजनैतिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
इस्रायली अधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत ती “ज्यूविरोधी दहशतवादाचे नीच कृत्य” असल्याचे म्हटले आहे.
होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी क्रिस्टी नोएम यांनी एक्स (ट्विटर) वरून निवेदन प्रसिद्ध करून मृत्यूची पुष्टी केली आणि संघीय पातळीवरून तपासासाठी सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे.
घटनास्थळी घेतलेल्या व्हिडिओमध्ये संग्रहालय बंद असतानाही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दिसून आला. मृत कर्मचाऱ्यांची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही. कुटुंबीयांना माहिती देईपर्यंत अधिक तपशील रोखले असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
अमेरिकेच्या अटर्नी जनरल पाम बॉंडी आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाच्या यूएस अटर्नी जीनिन पिरो या घटनास्थळी उपस्थित होत्या, मात्र अद्याप त्यांनी कोणतीही अधिकृत टिप्पणी दिलेली नाही.
संयुक्त राष्ट्रातील इस्रायलचे राजदूत डॅनी डॅनॉन यांनीही या गोळीबाराचा निषेध करत ते ज्यूविरोधी दहशतवादी कृत्य असल्याचे म्हटले. त्यांनी अमेरिकन अधिकाऱ्यांकडून दृढ आणि निर्णायक कारवाईची मागणी केली. डॅनॉन म्हणाले, “अमेरिकेचे अधिकारी जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करतील यावर आमचा विश्वास आहे. इस्रायल आपल्या नागरिकांचे आणि प्रतिनिधींचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे.”
दरम्यान, पोलिसांनी संशयित हल्लेखोराबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, रिपोर्टनुसार, एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की संशयित हल्लेखोरांनी “फ्री पॅलेस्टाईन” (Free Palestine) अशी घोषणा दिली होती.