Jagdish Devda Controversy | मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांच्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावरून सुरू असलेला वाद शांत होत नाही, तोच आता राज्याचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वादळ उठले आहे.
जबलपूरमध्ये नागरी संरक्षण स्वयंसेवकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला संबोधित करताना देवडा म्हणाले, “संपूर्ण देश, देशाची सेना आणि सैनिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरणी नतमस्तक आहेत.”‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल बोलताना जगदीश देवडा यांनी हे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.
पहलगाममध्ये (Pahalgam) झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “आमच्या मनात खूप राग होता, जे पर्यटक तिथे गेले होते… त्यांची धर्म विचारून निवड करून महिलांना एका बाजूला उभे करून लोकांना गोळ्या घालण्यात आल्या. ज्या दहशतवाद्यांनी मातांच्या कपाळावरील सिंदूर पुसण्याचे काम केले… ज्यांनी दहशतवाद्यांना पाळले, त्यांचा नायनाट करेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही… आणि यशस्वी पंतप्रधान मोदीजींचे आभार मानू इच्छितो, संपूर्ण देश आणि देशाची सेना, सैनिक त्यांच्या चरणी नतमस्तक आहेत, त्यांच्या चरणी संपूर्ण देश नतमस्तक आहे, त्यांनी जे उत्तर दिले आहे, त्याचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे.”
देवडा यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
'देश की सेना और सैनिक प्रधानमंत्री मोदी के चरणों में नतमस्तक हैं'
— Congress (@INCIndia) May 16, 2025
• ये बात मध्य प्रदेश की BJP सरकार के उपमुख्यमंत्री जगदीश देवड़ा ने कही है।
जगदीश देवड़ा का यह बयान बेहद ही घटिया और शर्मनाक है।
ये सेना के शौर्य और पराक्रम का अपमान है। जब पूरा देश आज सेना के सामने नतमस्तक… pic.twitter.com/uQmrj40qnj
राज्याचे अर्थमंत्री देवडा यांचे हे विधान ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात होते. या ऑपरेशन अंतर्गत, भारतीय लष्कराने (Indian Army) 7 मे रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तान आणि पीओकेमधील (POK) दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला होता. या ऑपरेशनमध्ये 100 हून अधिक दहशतवादी आणि अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेले होते.
देवडा यांनी या कारवाईबद्दल पंतप्रधानांचे कौतुक केले, परंतु त्यांच्या विधानातील ‘सेना पंतप्रधानांच्या चरणी नतमस्तक’ यावरून वाद निर्माण झाला आहे. आता विरोधकांनी हे लष्कराचा अपमान असल्याचे सांगून तीव्र टीका सुरू केली आहे.
काँग्रेसने म्हटले आहे की जगदीश देवडा यांचे हे विधान अत्यंत घृणास्पद आणि लाजिरवाणे आहे. पक्षाने ‘एक्स’ (X) वर म्हटले आहे, “हे लष्कराच्या शौर्य आणि पराक्रमाचा अपमान आहे. जेव्हा संपूर्ण देश आज लष्करासमोर नतमस्तक आहे, तेव्हा भाजपचे (BJP) नेते आपल्या घृणास्पद विचारसरणीचे प्रदर्शन करत आहेत. भाजप आणि जगदीश देवडा यांनी माफी मागावी आणि त्यांना पदावरून बडतर्फ करावे.”
दरम्यान, कर्नल सोफिया कुरेशी (Colonel Sophia Qureshi) यांच्यावर मध्य प्रदेश सरकारचे मंत्री कुंवर विजय शाह (Kunwar Vijay Shah) यांनी केलेल्या टिप्पणीवरूनही मोठा राजकीय वाद झाला होता. या टिप्पणीबद्दल कुंवर विजय शाह यांना न्यायालयाने फटकारले होते आणि त्यांच्याविरुद्ध एफआयआर (FIR) देखील दाखल करण्यात आला आहे.