Jaipur Hospital Fire Tragedy: राजस्थानमधील जयपूर येथील सवाई मान सिंग (SMS) सरकारी रुग्णालयाच्या ट्रोमा सेंटरमध्ये रविवारी रात्री उशिरा भीषण आग लागल्याने कमीत कमी 7 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्रोमा सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात ही आग लागली, ज्यात अनेक रुग्ण उपचार घेत होते.
आगीमुळे ट्रोमा सेंटरमध्ये घबराट पसरलीआणि धुरामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. या घटनेनंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत की, आग लागताच रुग्णालयाचे कर्मचारी घटनास्थळावरून पळून गेले.
#WATCH | Jaipur, Rajasthan | A massive fire broke out in an ICU ward of Sawai Man Singh (SMS) Hospital, claiming the lives of six patients pic.twitter.com/CBM6vcTMfZ
— ANI (@ANI) October 5, 2025
शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची शक्यता
ट्रोमा सेंटरचे प्रभारी अनुराग धाकड यांच्या माहितीनुसार, दुसऱ्या मजल्यावर 11 रुग्णांसह ट्रोमा आयसीयू आणि 13 रुग्णांसह सेमी-आयसीयू असे दोन विभाग होते. ट्रोमा आयसीयूमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग झपाट्याने पसरली आणि विषारी वायू बाहेर पडले.
मृत पावलेल्या 7 रुग्णांपैकी बहुतेक रुग्ण बेशुद्ध अवस्थेत आणि अतिगंभीर होते. डॉक्टरांनी CPR देऊनही त्यांना वाचवता आले नाही. मृतांमध्ये 2 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. इतर 5 रुग्णांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे 2 तासांत आगीवर नियंत्रण मिळवले.
#WATCH | Jaipur | Rajasthan CM Bhajanlal Sharma arrived at the Sawai Man Singh Hospital (SMS) to review the situation after a massive fire broke out pic.twitter.com/vhqY5S7p7m
— ANI (@ANI) October 5, 2025
कर्मचारी पळून गेल्याचा नातेवाईकांचा गंभीर आरोप
या घटनेनंतर ट्रोमा सेंटरला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि अन्य मंत्री आले असता पीडित कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. एका पीडितेच्या नातेवाईकाने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले, “धूर दिसताच आम्ही कर्मचाऱ्यांना माहिती दिली, पण त्यांनी लक्ष दिले नाही. आग लागल्यावर तेच पहिले पळून गेले. आता कोणीही रुग्णांच्या स्थितीबद्दल माहिती देत नाहीये.”
अन्य एका नातेवाईकांनी अग्निशमन उपकरणांचा अभाव असल्याचा आरोप केला.
मुख्यमंत्र्यांनी रद्द केला दौरा, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
या गंभीर घटनेनंतर मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी दिल्लीचा नियोजित दौरा रद्द केला आहे. त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त इकबाल खान यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
ही समिती आग लागण्याची कारणे, रुग्णालयाचे प्रतिसाद, अग्निशमन व्यवस्था आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठीच्या उपाययोजनांचा अहवाल सादर करेल.
दरम्यान, जयपूरचे पोलीस आयुक्त बिजू जॉर्ज जोसेफ यांनी सांगितले की, फॉरेन्सिक टीम आगीच्या नेमक्या कारणांचा शोध घेईल. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
हे देखील वाचा – फोनचा चार्जर बनला महत्त्वाचा पुरावा! पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील आरोपींच्या साथीदाराला ‘अशी’ झाली अटक