Japan Screen Time Law: सध्या गेमिंगपासून ते शिक्षणापर्यंत सर्वच गोष्टींसाठी आपण सर्वचजण स्मार्टफोनवर अवलंबून राहतो. मात्र, स्मार्टफोनचा अतिवापर आरोग्यासाठी धोकादायक ठरत असल्याच्या चिंतेमुळे जपानमधील एका शहराने मोठे पाऊल उचलले आहे. येथील स्थानिक सरकारने नागरिकांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी चक्क कायदा केला आहे.
जपानमधील आयची प्रांतातील टोयोआके शहराच्या स्थानिक असेंब्लीने 30 सप्टेंबर रोजी हा अध्यादेश मंजूर केला.
Japan Screen Time Law: काय आहे ‘स्क्रीन टाइम’चा नवीन नियम?
या नवीन कायद्यानुसार, नागरिक काम किंवा अभ्यासाव्यतिरिक्त दररोज केवळ 2 तास इतकाच वेळ मोबाईल, कॉम्प्युटर किंवा टॅबलेटवर घालवू शकतील.
स्क्रीनवर घालवला जाणारा वेळ कमी करणे आणि कुटुंबातील संवाद वाढवणे, हा या अध्यादेशाचा मुख्य उद्देश आहे. प्रशासनाने लहान मुलांना रात्री 9 वाजेनंतर, तर ज्युनियर हायस्कूल आणि 18 वर्षांखालील मुलांना रात्री 10 वाजेनंतर स्क्रीनपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
नियम कधीपासून लागू?
हा नियम 1 ऑक्टोबर पासून लागू झाला आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणताही दंड किंवा शिक्षा होणार नाही. हा कायदा केवळ जागरूकता निर्माण करण्यासाठी करण्यात आला आहे.
कायद्यामागची भूमिका
टोयोआकेचे महापौर मासाफुमी कोउकी (Masafumi Kouki) यांनी या कायद्याबद्दल स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “आम्ही स्मार्टफोनला अमान्य करत नाही आहोत. हा कायदा केवळ आरोग्य उपायांचा एक भाग आहे. लोकांना जागरूक करणे, हाच याचा उद्देश आहे. जेणेकरून, स्क्रीनचा अधिक वापर त्यांच्या झोपेवर आणि दिनचर्येवर परिणाम करत नाहीये, याची त्यांनी खात्री करावी.”
या कायद्यावर लोकांची मते विभागली आहेत. काहींना वाटते की स्थानिक प्रशासनाने कुटुंबाच्या खासगी बाबींमध्ये ढवळाढवळ करू नये, तर काही जण याला कुटुंबातील संवाद वाढवण्याची संधी मानत आहेत. असेंब्लीने हा अध्यादेश कालांतराने समीक्षा (करून त्यात बदल करण्याची तरतूदही ठेवली आहे.
जपानच्या आधी, अनेक देशांनी डिजिटल उपकरणांच्या वापरावर निर्बंध लादले आहेत: ऑस्ट्रेलियाने नोव्हेंबर 2024 मध्ये, 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बॅन लादणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश ठरला.दक्षिण कोरियाने या देशात मार्च 2026 पासून शाळेत मोबाईल फोन आणि डिजिटल उपकरणांवर प्रतिबंध लागू होणार आहे.
हे देखील वाचा – रिया चक्रवर्तीला 5 वर्षांनी परत मिळाला पासपोर्ट; भावनिक पोस्ट करत म्हणाली…









