पारंपरिक आणि आधुनिक वैद्यकीय शिक्षणाची जोड, लवकरच सुरू होणार MBBS-BAMS एकत्रित अभ्यासक्रम

JIPMER to offer India’s first integrated MBBS and BAMS |

JIPMER to offer India’s first integrated MBBS and BAMS | केंद्र सरकार लवकरच जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्टग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (JIPMER) मध्ये MBBS (Bachelor of Medicine, Bachelor of Surgery) आणि BAMS (Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery) यांचा एकत्रित वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्याच्या तयारीत आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री तसेच आयुष (स्वतंत्र प्रभार) मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.

पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सदर अभ्यासक्रम सध्या संकल्पनात्मक टप्प्यात आहे आणि अभ्यासक्रमाची रचना करण्याचे काम सुरू आहे.

जाधव यांनी सांगितले की, JIPMER च्या विस्तार योजनेनुसार संस्थेतील वैद्यकीय सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे. संस्थेच्या गव्हर्निंग बॉडीसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी विविध विभागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (National Medical Commission) 2022 मध्ये सर्व वैद्यकीय महाविद्यालयांत “इंटिग्रेटिव्ह मेडिसिन रिसर्च विभाग (Department of Integrative Medicine Research)” अनिवार्य केला होता. तर 2023 मध्ये MBBS च्या फाउंडेशन कोर्समध्ये भारतीय वैद्यक प्रणाली व आयुष विषयांचा समावेश करण्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले होते.

अनेक डॉक्टर संघटनांनी यास ‘मिक्सोपॅथी’ म्हणून टीका केली. त्यांचा आरोप होता की या पद्धतीने 2030 पर्यंत देशात केवळ संकरित डॉक्टर्स तयार होतील. मात्र, सरकार एमबीबीएस आणि बीएएमएसचा एकत्रित वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्याच्या तयारीत आहे.

दरम्यान, या वर्षी केंद्र सरकारने JIPMER साठी ₹1,450 कोटींचे अनुदानमंजूर केले आहे. सद्यस्थितीत ही संस्था दररोज 6,000 हून अधिक बाह्यरुग्ण आणि 1,800 आंतररुग्णांना सेवा पुरवते.

JIPMER च्या कराईकल कॅम्पसमध्ये (Karaikal campus) 470 खाटांचे नवे रुग्णालय उभारण्यात येत असून, जून 2027 पर्यंत ते पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. नवीन सुविधेमध्ये जानेवारी 2027 पासून बाह्यरुग्ण सेवा सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती संस्थेच्या संचालकांनी दिली.