रावळपिंडी – पाकिस्तानात (Pakistan) मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. या पूरपरिस्थितीत रावळपिंडीच्या चाहन धरणाजवळ थेट प्रसारण करत असताना एका पत्रकाराला (Journalist) जोरदार पाण्याच्या प्रवाहाने वाहून नेले. हा संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
हा व्हिडीओ (Video viral) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर चिंता आणि कौतुक अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. रावळपिंडीच्या चाहन धरणाजवळ पुरामध्ये संबंधित पत्रकार गळ्यापर्यंत पाण्यात उभा राहून थेट प्रसारण करत होता. तेवढ्यात अचानक पाण्याचा जोर वाढला आणि पत्रकाराचा तोल सुटून तो पाण्यात बुडू लागला. व्हिडीओमध्ये शेवटपर्यंत त्याचे फक्त डोके आणि माईक दिसत होते. त्यानंतर काही क्षणांतच तो प्रवाहात बेपत्ता झाला. हा व्हिडीओ ‘अल अरबिया इंग्लिश’ने फेसबुकवर शेअर केला आहे. यावर अनेकांनी पत्रकाराच्या धाडसाचे कौतुक केले, तर काहींनी अशा धोकादायक परिस्थितीत रिपोर्टिंग करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पत्रकारिता ही माहिती देण्याचे माध्यम आहे, जीव धोक्यात घालण्याचे नव्हे,” असे मत काहींनी व्यक्त केले आहे. तर काहींनी धोक्याच्या प्रसंगीही आपली जबाबदारी निभावणे हेच खरे पत्रकारितेचे ध्येय आहे, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.