Former CJI Justice Chandrachud | भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केंद्र सरकारला पत्र लिहून माजी सरन्यायाधीश धनंजय वाय. चंद्रचूड (Former CJI Justice Chandrachud) यांना सरकारी बंगला खाली करण्याची मागणी केली आहे. सध्या चंद्रचूड हे लुटीयन्स दिल्लीतील कृष्णा मेनन मार्गावरील बंगला क्रमांक 5 येथे राहत आहेत.
हा बंगला सध्याच्या सरन्यायाधीशांसाठी राखीव आहे, परंतु चंद्रचूड हे निवृत्तीनंतरही आठ महिन्यांहून अधिक काळ येथे वास्तव्यास आहेत. पत्रात, सर्वोच्च न्यायालयाने गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाला (MoHUA) त्वरित कारवाई करण्यास सांगितले, कारण चंद्रचूड यांना मंजूर केलेली मुदत 31 मे 2025 रोजी संपली आहे. याबाबत हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाऱ्याने MoHUA ला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 2022 च्या नियमांनुसार (Rule 3B) माजी सरन्यायाधीशांना सहा महिन्यांपर्यंत टाइप VII निवासस्थान ठेवण्याची परवानगी आहे. ही मुदत 10 मे 2025 रोजी संपली. तरीही, चंद्रचूड हे या बंगल्यात राहत आहेत.
पत्रात असेही नमूद आहे की, नवे सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि भूषण गवई यांनी या बंगल्यात स्थलांतर न करता अन्य निवासस्थाने पसंत केली, तर काही न्यायाधीश गेस्ट हाऊसमध्ये राहत आहेत.
चंद्रचूड यांचे स्पष्टीकरण
न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी विलंबाचे कारण वैयक्तिक आणि सक्तीच्या परिस्थिती असल्याचे सांगितले आहे. त्यांना तुघलक रोडवरील बंगला क्रमांक 14 वाटप झाला आहे, परंतु तो दुरुस्तीअंतर्गत आहे. त्यांच्या दोन मुलींना ‘नेमालिन मायोपॅथी’ या जनुकीय आजारामुळे विशेष काळजीची गरज आहे, ज्यामुळे योग्य निवासस्थान शोधण्यास वेळ लागला. चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाला याबाबत माहिती दिली असून, नवे निवासस्थान तयार होताच स्थलांतरित होण्याची तयारी दर्शवली आहे.
दरम्यान, न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी नोव्हेंबर 2022 ते नोव्हेंबर 2024 या काळात सरन्यायाधीशपद भूषवले. निवृत्तीनंतर त्यांनी तत्कालीन सरन्यायाधीश खन्ना यांना पत्र लिहून 30 एप्रिल 2025 पर्यंत बंगला ठेवण्याची परवानगी मागितली होती. MoHUA ने 5,430 रुपये मासिक भाड्याने ही परवानगी दिली. त्यानंतर, चंद्रचूड यांनी 31 मे 2025 पर्यंत तोंडी मुदतवाढ मागितली, जी मंजूर झाली, परंतु यापुढे मुदतवाढ न देण्याचे ठरले.