K.P. Sharma Oli : नेपाळमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून, बालेंद्र शाह यांचा पंतप्रधान पदावर शपथविधी झाल्यानंतर अवघ्या काही तासांत माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि माजी गृहमंत्री रमेश लेखक यांना अटक करण्यात आली. जेन – झी आंदोलनादरम्यान झालेल्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओली यांना आज सकाळी भक्तपूर येथील गुंडू येथील त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. तर रमेश लेखक यांना सूर्यविनायक येथून अटक केली. ही कारवाई गृह मंत्रालयाच्या तक्रारीनंतर सुरू झालेल्या चौकशीच्या आधारावर झाली आहे. एका चौकशी आयोगाने या नेत्यांवर निष्काळजीपणाचा खटला चालवण्याची शिफारस केली होती. या प्रकरणात 10 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.
या प्रकरणाच्या चौकशी आयोगाचे नेतृत्व माजी न्यायाधीश गौरी बहादूर कार्की यांनी केले होते. आयोगाने अहवालात म्हटले आहे की, आंदोलनादरम्यान परिस्थिती हाताळण्यात गंभीर निष्काळजीपणा झाला. अधिकार्यांना आधीच गुप्त माहिती मिळाली असूनही योग्य पावले उचलली नाहीत. ज्यामुळे परिस्थिती बिघडली आणि अनेक लोकांचा जीव गेला. अटकेपूर्वी पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा अहवाल लागू करण्याचा निर्णय झाला होता. यानंतरच पोलिसांनी मोठे पाऊल उचलले. अटकेदरम्यान काठमांडू खोर्यात सुरक्षा व्यवस्था कडक केली होती.
गेल्या वर्षी 8 सप्टेंबर रोजी नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधात मोठे आंदोलन उभे राहिले होते.
जेन – झी तरुणांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये तीव्र संघर्ष झाला. अनेक ठिकाणी तोडफोड, जाळपोळ आणि गोळीबाराच्या घटना घडल्या. या हिंसाचारात तब्बल 77 जणांचा मृत्यू झाला आणि अब्जावधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते.









