Karnataka Congress Power Sharing : कर्नाटकात (Karnataka) मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारने 2.5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यामुळे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या गटातील दहा काँग्रेस आमदार (MLA) अचानक दिल्लीत दाखल झाले. रिपोर्टनुसार, अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या नेतृत्वाच्या बदलाच्या सूत्राची अंमलबजावणी करावी यासाठी आमदारांनी पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे.
इंडिया टूडेच्या वृत्तानुसार, शिवकुमार यांच्या जवळचे मानले जाणारे हे आमदार दिल्लीत पोहोचले आणि त्यांनी केंद्रीय नेतृत्वाची भेट घेण्याची मागणी केली. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन ‘अडीच वर्षांपूर्वी पक्षश्रेष्ठींनी दिलेले आश्वासन’ पाळावे, अशी मागणी केली.
खर्गे आणि शिवकुमार यांची प्रतिक्रिया
आमदारांमध्ये दिनेश गुळिगोडा, रवी गनिगा आणि गुब्बी वासू यांचा समावेश होता. आमदार इकबाल हुसेन म्हणाले, “मी कशासाठी जात आहे? काही वैयक्तिक मागणीसाठी नाही. मी डी.के. शिवकुमार यांच्यासाठी जात आहे.”
या आमदारांच्या दिल्ली वारीबद्दल डी.के. शिवकुमार यांनी माध्यमांसमोर अनभिज्ञता दर्शवली. “मला काहीही माहिती नाही. मी कोणालाही तसे सांगितले नाही,” असे ते पत्रकारांना म्हणाले. सिद्धरामय्या मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील, या विधानावर त्यांनी आनंद व्यक्त केला आणि ‘आम्ही सर्व एकत्र काम करू’ असे सांगितले.
या घटनेनंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्व आमदारांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
यापूर्वी, सिद्धरामय्या यांनी नेतृत्वातील बदलाच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या आणि ‘नोव्हेंबर क्रांती’ ही केवळ माध्यमांनी निर्माण केलेली गोष्ट असल्याचे म्हटले होते. “लोकांनी आम्हाला पाच वर्षांसाठी सत्ता दिली आहे, ती आम्ही पूर्ण करू,” असे ते म्हणाले. मंत्रिमंडळात फेरबदल करण्याच्या चर्चेचा चुकीचा अर्थ नेतृत्वबदल असा काढला गेल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सत्तावाटपाची पार्श्वभूमी
दरम्यान, मे 2023 मध्ये सरकार स्थापन झाल्यापासून सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यातील मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेनंतर डी.के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यावेळी 2.5 वर्षांनंतर शिवकुमार मुख्यमंत्री होतील, असे सूत्रांनी सांगितले होते. मात्र, काँग्रेस पक्षाने या व्यवस्थेची कधीही अधिकृत घोषणा केली नाही.
हे देखील वाचा – Justice BR Gavai : ‘मी बौद्ध धर्माचे पालन करत असलो तरी,…’; निवृत्तीपूर्वी सरन्यायाधीश गवई यांनी धर्मनिरपेक्ष विचारांबद्दल केले भाष्य









