पगार 15000, मात्र संपत्ती तब्बल 30 कोटी; ‘या’ क्लार्कच्या भ्रष्टाचाराचा कारनामा पाहून सर्वच चकित

Karnataka Clerk's 30 Crore Wealth Scam

Karnataka Clerk’s 30 Crore Wealth Scam: सरकारी विभागांमध्ये भ्रष्टाचार किती खोलपर्यंत पसरला आहे, याची अनेक उदाहरणे दररोज पाहायला मिळतात. आता अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये अगदी 15 हजार रुपये पगार असलेल्या सरकारी कर्मचाऱ्याकडे कोट्यावधीची मालमत्ता आढळून आली.

कर्नाटकात लोकायुक्त (Lokayukta) अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. कर्नाटक ग्रामीण पायाभूत विकास मर्यादित (KRIDL) मध्ये काम करणाऱ्या एका माजी क्लार्कच्या (Karnataka Clerk’s 30 Crore Wealth Scam) घरावर शुक्रवारी छापा टाकण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, फक्त 15,000 रुपये महिन्याला पगार असलेल्या या क्लार्ककडे 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची बेहिशेबी संपत्ती आढळून आली आहे.

माजी क्लार्क कलाकप्पा निडागुंडी याच्याकडे एकूण 24 घरे, 4 प्लॉट्स आणि 40 एकर शेतजमीन असल्याची माहिती लोकायुक्त अधिकाऱ्यांनी दिली आहे. याशिवाय, त्याच्याकडून 4 वाहने, 350 ग्रॅम सोने आणि 1.5 किलो चांदीही जप्त करण्यात आली आहे. ही सर्व संपत्ती त्याच्या, त्याच्या पत्नीच्या आणि मेहुण्याच्या नावावर होती.

72 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप

रिपोर्टनुसार, कलाकप्पा निडागुंडी आणि केआरआयडीएलचा माजी अभियंता झेड.एम. चिंचोळकर यांनी 96 अपूर्ण प्रकल्पांची खोटी कागदपत्रे तयार करून 72 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

लोकायुक्तची जोरदार मोहीम सुरू

लोकायुक्त अधिकारी गेल्या काही दिवसांपासून बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याच्या आरोपाखाली सरकारी अधिकाऱ्यांवर छापे टाकत आहेत. यापूर्वीही अनेक मोठ्या अधिकाऱ्यांवर छापे टाकण्यात आले आहेत.

छाप्यांमध्ये लोकायुक्तने एका आयएएस (IAS) अधिकाऱ्यासह 8 अधिकाऱ्यांच्या 41 ठिकाणांवर छापे टाकले होते. या छाप्यांमध्ये 37.42 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. यामध्ये आयएएस अधिकारी बसंती अमर यांच्या पाच ठिकाणांवर छापा टाकून 9.03 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. लोकायुक्तच्या या सातत्यपूर्ण कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.