Kedarnath Helicopter Crash | अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघाताची घटना ताजी असतानाच, उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टरा अपघात झाला आहे. उत्तराखंडच्या (Uttarakhand) केदारनाथ मंदिरातून (Kedarnath Temple) गुप्तकाशीकडे जाणाऱ्या एका हेलिकॉप्टरचा (Helicopter Crash) घनदाट जंगलात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पायलटसह (Pilot) सात जणांचा मृत्यू झाला.
गौरीकुंड आणि सोनप्रयाग दरम्यान सकाळी घडलेल्या या अपघाताने चार धाम यात्रेला धक्का बसला आहे. आर्यन एव्हिएशनच्याया हेलिकॉप्टरमध्ये उत्तराखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधील सहा भाविक होते.
अपघात कसा झाला?
उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाच्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाड आणि खराब हवामान यामुळे हा अपघात झाला असावा. स्थानिकांनी कोसळलेलं हेलिकॉप्टर पाहिलं आणि प्रशासनाला कळवलं. राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दल आणि राज्य आपत्कालीन प्रतिसाद दल तातडीने घटनास्थळी पोहोचले.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी X वर ही घटना “अत्यंत दुःखद” (Distressing) असल्याचं सांगितलं. “बचाव पथके आणि स्थानिक प्रशासन मदतकार्यात गुंतलं आहे,” असं त्यांनी सांगितले.
सलग पाचवा अपघात, हेलिसेवा बंद
2 मे 2025 पासून केदारनाथ मंदिर उघडल्यापासून हा पाचवा हेलिकॉप्टर अपघात आहे. यापूर्वी 7 जूनला एका हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाडामुळे महामार्गावर उतरावं लागलं होतं. चार धाम यात्रेतील (Char Dham Yatra) अशा घटनांमुळे चिंता वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री धामी यांनी रविवारी हेलिकॉप्टर सेवांच्या सुरक्षिततेसाठी कठोर निर्देश दिले आणि चार धाम क्षेत्रातील हेलिसेवा तात्पुरती बंद केली. UCADA आणि नागरी विमान वाहतूक संचालनालय यांच्या समन्वयाने सुरक्षा प्रोटोकॉलची सखोल तपासणी होईपर्यंत ही बंदी कायम राहील.
मुख्यमंत्र्यांनी हेलिसेवांसाठी कठोर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर लागू करण्याचे आदेश दिले. यात हेलिकॉप्टरची तांत्रिक तपासणी आणि उड्डाणापूर्वी हवामानाची अचूक माहितीघेणं बंधनकारक असेल. तांत्रिक तज्ञांची समिती स्थापन करून हेलिसेवा सुरक्षित आणि पारदर्शक करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत.