Prince Andrew Arrested: ब्रिटनच्या राजघराण्यातील अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्व आणि किंग चार्ल्स यांचे धाकटे बंधू अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर यांना पोलिसांनी अटक केली आहे. या ऐतिहासिक अटकेनंतर किंग चार्ल्स यांनी आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी ब्रिटीश पोलिसांना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे.
वाढदिवसाच्या दिवशीच कारवाईचा धडाका
१९ फेब्रुवारी २०२६ रोजी अँड्र्यू यांचा ६६ वा वाढदिवस होता. याच दिवशी सकाळी ८:०० वाजता सँड्रिंगहॅम इस्टेटमधील ‘वूड फार्म’ या त्यांच्या निवासस्थानी पोलिसांनी छापा टाकला. साध्या वेशातील ८ अधिकारी आणि ६ वाहनांच्या ताफ्याने अँड्र्यू यांना ताब्यात घेतले. अँड्र्यू यांनी सरकारी पदावर असताना गोपनीय कागदपत्रे वादग्रस्त उद्योगपती जेफ्री एपस्टीन याला पुरवल्याचा गंभीर संशय पोलिसांना आहे.
किंग चार्ल्स यांचे स्पष्ट शब्द: “कायदा त्याचे काम करेल”
आपल्या सख्ख्या भावाच्या अटकेवर किंग चार्ल्स यांनी अत्यंत कठोर पण न्यायाची भूमिका मांडली आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक पदाचा गैरवापर केल्याच्या संशयावरून अँड्र्यू यांच्यावर होत असलेल्या कारवाईबद्दल मला तीव्र चिंता वाटत आहे. कायदा कोणासाठीही थांबत नाही आणि तो आपले काम चोखपणे करेल.कोणाचेही नाव किंवा पद कायद्यापेक्षा मोठे असू शकत नाही.
तपासाचा मुख्य केंद्रबिंदू: ‘एपस्टीन फाईल्स’
अमेरिकेच्या न्याय विभागाने २०२६ च्या सुरुवातीला प्रसिद्ध केलेल्या ‘एपस्टीन फाईल्स’मुळे अँड्र्यू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. २०१० मधील काही ईमेल्स तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. जेव्हा अँड्र्यू ब्रिटनचे व्यापार दूत म्हणून काम करत होते, तेव्हा त्यांनी अत्यंत संवेदनशील व्यापारी अहवाल आणि गुंतवणुकीची माहिती जेफ्री एपस्टीनला पाठवल्याचा आरोप आहे. एका ईमेलमध्ये तर अधिकृत सल्लागाराने माहिती पाठवल्याच्या अवघ्या ५ मिनिटांनंतर ती एपस्टीनला फॉरवर्ड केल्याचे समोर आले आहे.
राजकीय आणि सामाजिक पडसाद
ब्रिटीश इतिहासात पहिल्यांदाच राजघराण्यातील एका वरिष्ठ सदस्यावर अशा प्रकारे गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप होऊन अटक करण्यात आली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांनीही यावर भाष्य करताना म्हटले आहे की, “कायद्यासमोर सर्व समान आहेत.” दुसरीकडे, अँड्र्यू यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या व्हर्जिनिया जुफ्रे यांच्या कुटुंबाने या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
हे देखील वाचा – MLA Ramdas Masram Case: मुरुम उत्खननावरून राडा! काँग्रेस आमदारासह 6 जणांवर गुन्हा; मजुराला मारहाण केल्याचा आरोप















