कोलकाता हादरलं! 24 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, TMC च्या विद्यार्थी नेत्याला अटक

Kolkata Gang Rape Case

Kolkata Gang Rape Case | कोलकात्यातील एका लॉ कॉलेजमध्ये 24 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) विद्यार्थी संघटनेचा नेता असलेल्या मनोजित मिश्रासह तिघांना अटक करण्यात आली आहे.

सहा महिन्यांपूर्वी आरजी कर मेडिकल कॉलेजमधील अशाच एका घटनेनंतर पुन्हा घडलेल्या या कृत्याने कोलकाता आणि देशभरात संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) याची गंभीर दखल घेत तपासाचे आदेश दिले आहेत.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 25 जून 2025 रोजी सायंकाळी 7:30 ते 10:50 या वेळेत कॉलेज कॅम्पसमधील सुरक्षा रक्षकाच्या खोलीत घडली. पीडित विद्यार्थिनी परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी दुपारी 12 वाजता कॉलेजमध्ये आली होती. ती कॉलेजच्या युनियन रूममध्ये बसली असताना मुख्य आरोपी मनोजित मिश्रा (31) याने कॉलेजचे मुख्य गेट बंद करण्यास सांगितले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. वैद्यकीय तपासणीत पीडितेच्या शरीरावर मारहाणीचे, दातांचे आणि नखांचे ओरखडे आढळले, ज्यामुळे तिच्या आरोपांना पुष्टी मिळाली.

पोलिसांनी तक्रारीच्या आधारे तपास सुरू करत मनोजित मिश्रा, जैब अहमद (19) आणि प्रमित मुखर्जी (20) यांना अटक केली. मिश्रा हा तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा (TMCP) दक्षिण कोलकाता जिल्हा सरचिटणीस आहे. गुरुवारी तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

या घटनेमुळे भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय वाद पेटला आहे. भाजपकडून मिश्राचे ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत टीका केली.

पीडितेची आपबीती

पीडितेने तक्रारीत सांगितले की, मिश्राने तिला लग्नाची मागणी घातली होती, परंतु तिने नकार दिल्याने तो चिडला. तिने दयेची याचना केली, त्याचे पाय धरले, तरीही त्याने आणि इतर दोन आरोपींनी तिच्यावर अत्याचार केले. त्यांनी तिला मारहाण करत जीवे मारण्याची आणि व्हिडिओ लीक करण्याची धमकी दिली., असे तिने पोलिसांना सांगितले.

राष्ट्रीय महिला आयोगाची दखल

राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) कोलकाता पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तातडीने तपासाचे आदेश दिले आहेत. त्यांनी तीन दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या घटनेने शिक्षण संस्थांमधील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.