Home / देश-विदेश / Kumbhmela Girl Monalisa Marriage : ‘लव्ह जिहाद’चा बळी ठरली मोनालिसा? फरमानशी लग्न नव्हे तर सौदा, मोनालिसा-फरमान लग्नावर दिग्दर्शकाचे गंभीर आरोप

Kumbhmela Girl Monalisa Marriage : ‘लव्ह जिहाद’चा बळी ठरली मोनालिसा? फरमानशी लग्न नव्हे तर सौदा, मोनालिसा-फरमान लग्नावर दिग्दर्शकाचे गंभीर आरोप

Kumbhmela Girl Monalisa Marriage : सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली आणि ‘कुंभमेळा गर्ल’ म्हणून प्रसिद्धी झोतात आलेली १८ वर्षीय मोनालिसा...

By: Team Navakal
Kumbhmela Girl Monalisa Marriage
Social + WhatsApp CTA

Kumbhmela Girl Monalisa Marriage : सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली आणि ‘कुंभमेळा गर्ल’ म्हणून प्रसिद्धी झोतात आलेली १८ वर्षीय मोनालिसा भोसले हिने आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. मोनालिसाने तिचा प्रियकर फर्मान खान याच्यासोबत ११ मार्च रोजी केरळमध्ये आंतरधर्मीय विवाह केला. या विवाह सोहळ्याची छायाचित्रे आणि माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

केरळमधील मंदिरात पार पडला सोहळा-
हा विशेष विवाह सोहळा केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यापासून जवळ असलेल्या पूवार येथील अरुमनूर श्री नैनार देवा मंदिरात अतिशय साधेपणाने परंतु विधीवत पार पडला. निसर्गरम्य केरळमध्ये पार पडलेल्या या विवाह सोहळ्यासाठी मोजकेच लोक उपस्थित होते. मोनालिसा आणि फर्मान यांचा हा विवाह आंतरधर्मीय असल्याने या घटनेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कौटुंबिक विरोध झुगारून ‘कुंभमेळा गर्ल’चा प्रेमविवाह; चित्रपट चित्रीकरणादरम्यान वडिलांचा हस्तक्षेप आणि पोलिसांत धाव-
मध्य प्रदेशातील इंदूरची रहिवासी आणि ‘कुंभमेळा गर्ल’ म्हणून ख्याती मिळवलेली मोनालिसा भोसले हिचा विवाह सोहळा केवळ आंतरधर्मीय स्वरूपामुळेच नव्हे, तर त्यापूर्वी घडलेल्या अत्यंत नाट्यमय घडामोडींमुळेही चर्चेत आला आहे. स्वतःच्या वडिलांचा प्रखर विरोध आणि घरचा दबाव झुगारून मोनालिसाने अखेर आपला प्रियकर फर्मान खान याच्याशी केरळमध्ये गाठ बांधली. मात्र, या प्रवासात तिला कौटुंबिक संघर्षाला आणि कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागले.

फेसबुकवरील मैत्रीचे प्रेमात रूपांतर-
मोनालिसा आणि फर्मान खान यांची ओळख साधारण सहा महिन्यांपूर्वी सामाजिक माध्यम असलेल्या फेसबुकवरून झाली होती. या ओळखीचे रूपांतर लवकरच निखळ मैत्रीत आणि पुढे प्रेमात झाले. मात्र, हे नाते स्वीकारण्यास मोनालिसाच्या कुटुंबीयांचा, विशेषतः तिचे वडील जयसिंह भोसले यांचा तीव्र विरोध होता. दोघांचे धर्म भिन्न असल्याने समाजात आणि नात्यात अडचणी येतील, या भीतीपोटी वडिलांनी या प्रेमाला नकार दिला. इतकेच नव्हे, तर मोनालिसावर तिच्या इच्छेविरुद्ध एका दूरच्या नातेवाईकाशी विवाह करण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला.

‘नागम्मा’ चित्रपटाचे चित्रीकरण आणि वडिलांचा पाठलाग-
मोनालिसा सध्या तिच्या अभिनय कारकीर्दीवर लक्ष केंद्रित करत असून, केरळमधील पूवार येथे तिच्या पहिल्या मल्याळम चित्रपट ‘नागम्मा’च्या चित्रीकरणात ती व्यस्त होती. ही माहिती मिळताच तिचे वडील तिला शोधत थेट केरळमधील चित्रीकरणाच्या ठिकाणी पोहोचले. तेथून तिला जबरदस्तीने इंदूरला परत नेण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेमुळे चित्रीकरणाच्या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलीस संरक्षण आणि कायदेशीर पवित्रा-
वडिलांच्या वाढत्या दबावामुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव मोनालिसा आणि फर्मान यांनी तातडीने तिरुवनंतपुरममधील थंपानूर पोलीस ठाणे गाठले. आपण सज्ञान असून स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्यास सक्षम आहोत, असे सांगत त्यांनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली.

पोलिसांचा हस्तक्षेप आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती; मोनालिसा-फर्मानचा विवाह ठरला “खरी केरळ स्टोरी”-
‘कुंभमेळा गर्ल’ मोनालिसा भोसले आणि फर्मान खान यांच्या प्रेमविवाहाने आता एक सामाजिक आणि राजकीय परिमाण प्राप्त केले आहे. वडिलांच्या विरोधानंतर निर्माण झालेल्या कायदेशीर पेचप्रसंगात पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मोनालिसाने थंपानूर पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर, पोलिसांनी तिचे वडील जयसिंह भोसले यांना पाचारण केले. यावेळी पोलिसांनी कायदेशीर तरतुदींचा हवाला देत स्पष्ट केले की, मोनालिसा ही अठरा वर्षांची सज्ञान युवती असल्याने, तिला तिचे आयुष्य कोणासोबत व्यतीत करायचे आहे, याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार भारतीय संविधानाने दिला आहे.

पोलीस ठाण्यातून थेट विवाह मंडपाकडे प्रस्थान-
पोलीस प्रशासनाने मोनालिसाच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा सन्मान राखत तिला संरक्षण दिले. त्यानंतर ती तिचा जोडीदार फर्मान खान याच्यासोबत पोलीस ठाण्यातून बाहेर पडली. या संघर्षावर मात केल्यानंतर दोघांनीही मंदिरात जाऊन हिंदू रीतीरिवाजांनुसार विवाह सोहळा संपन्न केला. या विवाह सोहळ्यात केरळमधील अनेक मान्यवरांनी पुढाकार घेतल्याचे दिसून आले.

“हीच खरी केरळ स्टोरी”; मंत्र्यांनी संबोधले-
या विवाह सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे केरळमधील अनेक बड्या राजकीय नेत्यांची या कार्यक्रमाला असलेली उपस्थिती. केरळचे शिक्षणमंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी या विवाहाला उपस्थित राहून नवविवाहित दांपत्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी या विवाहाचे वर्णन “खरी केरळ स्टोरी” (Real Kerala Story) असे केले.

‘कुंभमेळा गर्ल’ आता मल्याळम आणि बॉलिवूड चित्रपटांतून करणार पदार्पण-
सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या मोनालिसा भोसले हिच्या विवाह सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. आपल्या विवाहासाठी तिने आणि तिचा पती फर्मान खान याने अत्यंत देखण्या पारंपारिक वेशभूषेची निवड केली होती. मोनालिसाने लाल रंगाची भरजरी साडी आणि कपाळावर सिंदूर लावून एका पारंपारिक हिंदू वधूचा साज लेकला होता, तर फर्मान खान याने पांढरा शुभ्र शर्ट आणि केरळची संस्कृती दर्शवणारा ‘मुंडू’ (धोतर) परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दोन भिन्न संस्कृतींचा हा मिलाफ या विवाह सोहळ्यात प्रकर्षाने दिसून आला.

प्रयागराजच्या महाकुंभाने बदलले नशीब-
मोनालिसा भोसले हे नाव २०२५ मधील प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यादरम्यान प्रकाशझोतात आले. त्यावेळी ती कुंभमेळ्याच्या परिसरात रुद्राक्षाच्या आणि फुलांच्या माळा विक्री करत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. तिचे अंबर रंगाचे आकर्षक डोळे, मोहक स्मितहास्य आणि तिचे नैसर्गिक सौंदर्य पाहून नेटकऱ्यांनी तिला जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या ‘मोनालिसा’ चित्राशी साधर्म्य शोधून हे टोपणनाव दिले. याच व्हिडिओमुळे ती केवळ इंटरनेट सेन्सेशनच ठरली नाही, तर तिला अभिनयाच्या संधीही चालून आल्या.

मल्याळम आणि बॉलिवूडमध्ये अभिनयाचे पदार्पण-
विवाहाच्या सुखद वार्तांसोबतच मोनालिसा आता रुपेरी पडद्यावरही आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. दिग्दर्शक पी. बिनू वर्गीस यांच्या ‘नागम्मा’ या आगामी मल्याळम चित्रपटातून ती अभिनय क्षेत्रात पदार्पण (डेब्यू) करत आहे. या चित्रपटात ती प्रसिद्ध मल्याळम अभिनेता कैलाश याच्यासोबत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. प्रादेशिक चित्रपटांनंतर तिची पावले आता बॉलिवूडकडेही वळली असून, दिग्दर्शक सनोझ मिश्रा यांच्या ‘द डायरी ऑफ मणिपूर’ या हिंदी चित्रपटातही ती एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

मोनालिसाचा नवरा फरमान खान कोण?
सोशल मीडिया सेन्सेशन मोनालिसा भोसले आणि फर्मान खान यांचा विवाह सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असून, या जोडीबद्दल नवनवीन माहिती समोर येत आहे. मोनालिसाचा पती फर्मान खान हा केवळ तिचा जीवनसाथीच नाही, तर तोदेखील कलाक्षेत्राशी निगडित आहे. फर्मान हा एक व्यावसायिक मॉडेल असून त्याने अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. दोघांचीही पार्श्वभूमी अभिनय आणि ग्लॅमर विश्वाशी संबंधित असल्याने त्यांची ही जोडी आता रसिक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

‘मोनालिसाचा विवाह म्हणजे प्रेम नव्हे, तर सौदा’; तिला अभिनेत्री बनवणाऱ्या दिग्दर्शकाचा ‘लव्ह जिहाद’चा खळबळजनक आरोप-
मुंबई: ‘कुंभमेळा गर्ल’ म्हणून प्रसिद्ध झालेली मोनालिसा भोसले हिचा विवाह सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तिला अभिनय क्षेत्रात संधी देणारे आणि ‘द डायरी ऑफ मणिपूर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी सोशल मीडियावर एक प्रदीर्घ पोस्ट शेअर करत या विवासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मोनालिसाचा हा विवाह नसून तो एक आर्थिक ‘सौदा’ असल्याचा खळबळजनक दावा मिश्रा यांनी केला असून, याला त्यांनी ‘लव्ह जिहाद’ असे संबोधले आहे. त्यांच्या या विधानामुळे चित्रपटसृष्टीत आणि सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.

“गंगेसारख्या पवित्र मुलीचे धर्मांतर”; सनोज मिश्रा यांची व्यथा-
सनोज मिश्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये मोनालिसाचा उल्लेख करताना अत्यंत निराशा व्यक्त केली आहे. ते म्हणतात की, “कुंभमेळ्यातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जंगलात राहणाऱ्या या गरीब मुलीचे गंगा मातेसारखे पावित्र्य पाहून मी तिला अभिनयाचे प्रशिक्षण दिले आणि माझ्या चित्रपटात प्रमुख भूमिका दिली. संपूर्ण जगाने तिचे स्वागत केले. मात्र, माझ्या विरोधकांना हे रुचले नाही आणि त्यांनी मला खोट्या आरोपाखाली तुरुंगात धाडले.” मिश्रा यांच्या मते, त्यांच्या अनुपस्थितीत मोनालिसाच्या आयुष्यात अनेक अनिष्ट शक्तींनी प्रवेश केला आणि तिचा गैरफायदा घेतला गेला.

कौटुंबिक कलह आणि बंजारा समाजाची पार्श्वभूमी-
दिग्दर्शकाने मोनालिसाच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवरही प्रकाश टाकला आहे. मोनालिसाचे वडील आणि नातेवाईक तिला केवळ एक साधन मानत होते, असा आरोप त्यांनी केला. तिची खरी आई घरातून हाकलून दिली गेली होती आणि वडिलांनी दुसरे लग्न केले होते. बंजारा समुदायातील कठोर नियमांमुळे मोनालिसाला सावत्र आईच्या छायेखाली अनेक तडजोडी कराव्या लागल्या. जेव्हा मोनालिसा सेलिब्रिटी झाली, तेव्हा तिला तिच्या खऱ्या आईला गरिबीत माळा विकताना पाहून खूप दुःख व्हायचे. कौटुंबिक जाचातून मुक्त होण्यासाठी तिने बंड करण्याची इच्छा अनेकदा व्यक्त केली होती, असेही मिश्रा यांनी नमूद केले.

“मॅनेजर बनला दलाल”; दक्षिण भारतात व्यापाराचा आरोप-
सनोज मिश्रा यांनी सर्वात गंभीर आरोप मोनालिसाच्या मॅनेजरवर केला आहे. ज्या व्यक्तीला त्यांनी स्वतः पैसे देऊन मोनालिसाला प्रशिक्षण देण्यासाठी नेमले होते, तोच व्यक्ती ‘दलाल’ बनल्याचा दावा मिश्रा यांनी केला आहे. “हा तोतया शिक्षक मोनालिसाचा व्यापार दक्षिण भारतात करू लागला आणि त्यानेच तिचा सौदा केला. हळूहळू मला बंजारा समुदायापासून दूर करण्यात आले आणि आज त्याचे परिणाम जगासमोर आहेत,” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. मोनालिसाला वाटत असेल की तिने कुटुंबाविरुद्ध बंड केले आहे, परंतु प्रत्यक्षात ती ‘लव्ह जिहाद’ची बळी ठरली आहे, असा दावाही त्यांनी केला.

वादाचे नवे वळण-
मोनालिसाने केरळमध्ये मोठ्या राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत विवाह केला असतानाच, तिच्या मार्गदर्शक दिग्दर्शकाने केलेल्या या आरोपांमुळे या प्रकरणाला आता राजकीय आणि धार्मिक वळण मिळण्याची शक्यता आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या