Kurnool Bus Fire : आंध्र प्रदेशमधील(Andhra Pradesh) कुर्नूल(Kurnool)या ठिकाणी एका व्होल्वो बसला भयंकर अशी आग लागल्याची दुर्दैवी घटना आज पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. हैदराबादहून(Hyderabad)बंगळुरूकडे जाणाऱ्या या खासगी बस आणि दुचाकीची धडक झाली. त्यानंतर बसला आग लागली आणि या अपघातात सुमारे २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीर जखमी झाले. जखमींना कुर्नूल जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
कुर्नूलजवळील चिन्नातेकुरु गावाजवळून हैदराबादहून बंगळुरूकडे सुमारे ४० प्रवासी घेऊन लक्झरी बस जात होती. या दुर्दवी घटनेच्या प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी सांगितलं की, एक मोटरसायकल बसला येऊन धडकली आणि अचानक बसला भीषण अशी आग लागली. त्यानंतर पुढच्या काही सेकंदातच बस जळून खाक झाली. जेव्हा मोटरसायकल आणि बसची धडक झाली तेव्हा बसच्या इंधनाची टाकी फुटली गेली आणि त्यानंतर आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यादरम्यान झोपलेले प्रवासी जागे झाले. मात्र आगीच्या ज्वाळा आणि धुरामुळे त्यांना बसमधून बाहेर पडता आले नाही. काही प्रवाशांनी खिडक्या फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.परंतु अनेकजण अपयशी ठरले. तर स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. परंतु मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे आले. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत बस जवळपास पूर्णपणे जळून खाक झाली होती. अपघातानंतर बसचा चालक आणि क्लीनर घटनास्थळावरून बेपत्ता झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
आंध्र प्रदेशातील कुर्नूलमधील बसच्या या दुर्दैवी घटनेबाबत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दुःख व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात की, “कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकूर गावाजवळ झालेल्या भीषण बस आगीच्या दुर्घटनेबद्दल ऐकून मला मोठा धक्का बसला. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना आहेत. तसेच या घटनेत जखमी आणि बाधित कुटुंबांना सरकार सर्वतोपरी मदत करेल.”असे आश्वासन देखील त्यांनी दिले.
Extremely saddened by the loss of lives due to a mishap in Kurnool district of Andhra Pradesh. My thoughts are with the affected people and their families during this difficult time. Praying for the speedy recovery of the injured.
— PMO India (@PMOIndia) October 24, 2025
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be…
टीडीपी आमदार लोकेश नारा यांनी म्हटलं की, “कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकूर गावाजवळ झालेल्या भीषण बस आगीच्या दुर्घटनेची बातमी हि अत्यंत हृदयद्रावक आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना आहेत.
या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एक्सवर (ट्विट) करत संवेदना व्यक्त केली आहे. ते म्हणतात “आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल अत्यंत दुःख झालं आहे, या कठीण प्रसंगात माझ्या संवेदना बाधित लोक आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये दिले जातील आणि जखमींना ५०,००० रुपयांची मदत दिली जाईल”, अशी घोषणा पंतप्रधान कार्यालयाने एक्सवर (ट्विटर)केली आहे.
हे देखील वाचा – Satara Crime : साताऱ्यात महिला डॉक्टरने केली आत्महत्या; हातावर सुसाईड नोट लिहत केलं आत्महत्येचं कारण स्पष्ट?









