Home / देश-विदेश / भारतातील सत्ता बदलण्याचा चीनचा डाव? तिबेटच्या नेत्याने केला ‘हा’ मोठा दावा

भारतातील सत्ता बदलण्याचा चीनचा डाव? तिबेटच्या नेत्याने केला ‘हा’ मोठा दावा

China India Relations: चीन भारताच्या राजकारण्यांवर प्रभाव टाकून देशातील सत्ता बदलण्याचा प्रयत्न करत आहे, असा खळबळजनक आरोप तिबेटच्या निर्वासित सरकारचे...

By: Team Navakal
China India Relations

China India Relations: चीन भारताच्या राजकारण्यांवर प्रभाव टाकून देशातील सत्ता बदलण्याचा प्रयत्न करत आहे, असा खळबळजनक आरोप तिबेटच्या निर्वासित सरकारचे माजी अध्यक्ष डॉ. लोबसांग सांग्ये (Dr. Lobsang Sangay) यांनी केला आहे.

‘एलिट को-ऑप्शन’ (Elite Co-option) ही चीनची जुनी रणनीती असून, याद्वारे ते नेते, पत्रकार, व्यावसायिक आणि अगदी यूट्यूबर्सनाही विकत घेत आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.

‘एलिट कॅप्चर’ने भारतालाही धोका

डॉ. सांग्ये यांनी सांगितले की, चीनने याच रणनीतीचा वापर करून तिबेट, शिनजियांग आणि मंगोलियामध्ये हस्तक्षेप केला आणि आता तेच भारतात करत आहेत.

“तुम्ही दिल्लीतील चिनी दूतावासाच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमांना कोण हजर असते ते तपासा. तुम्हाला राजकारणी आणि व्यावसायिक दिसतील,” असे ते म्हणाले. “हे सगळे विकत घेतलेले नाहीत, पण चीनचे प्रयत्न सतत सुरू आहेत,” असे त्यांनी सांगितले.

भारताच्या शेजारील देशांमध्येही चीन अशाच प्रकारचे डावपेच वापरत असल्याचा दावा त्यांनी केला.

“नेपाळमध्ये एक पक्ष उघडपणे चीन समर्थक आहे. श्रीलंका, बांगलादेश आणि मालदीवमध्येही चीनने सत्ताधारी वर्गाला आपल्या बाजूने वळवले आहे. पाकिस्तानमध्ये तर सर्व प्रमुख राजकीय पक्ष चीनला पाठिंबा देतात. हेच ‘एलिट कॅप्चर’चे उत्तम उदाहरण आहे,” असे सांग्ये म्हणाले.

आर्थिक आणि भूराजकीय आव्हान

सांग्ये यांच्या मते, चीनचा हा हस्तक्षेप केवळ राजकीय नसून तो भारताला कमकुवत करून दक्षिण आशियावर वर्चस्व गाजवण्याच्या मोठ्या भू-राजकीय धोरणाचा भाग आहे. “चीन मालदीव, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळला का पाठिंबा देत आहे? भारतावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात संयुक्त राष्ट्र ठराव येण्यास ते का अडथळे निर्माण करत आहेत? कारण त्यांना भारताला एका जागी कोंडून ठेवायचे आहे,” असे त्यांनी म्हटले.

यासोबतच त्यांनी भारत आणि चीनमधील मोठ्या व्यापारी तुटीकडेही लक्ष वेधले. “भारत चीनकडून 113 अब्ज डॉलरची वस्तू खरेदी करतो, तर चीनला फक्त 14 अब्ज डॉलरची वस्तू विकतो. याचा अर्थ 99 अब्ज डॉलरची मोठी व्यापारी तूट आहे. याचा परिणाम भारतातील नोकऱ्या आणि उत्पादनांवर होतो,” असा इशारा त्यांनी दिला. कोणत्याही पक्षातल्या नेत्यांनी चीनच्या या रणनीतीपासून सावध राहायला हवे, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे देखील वाचा पोलिसांनी अडवली फ्रेंच राष्ट्राध्यक्षांची गाडी, मॅक्रॉन यांनी थेट ट्रम्प यांना लावला फोन; व्हिडिओ व्हायरल

Web Title:
संबंधित बातम्या