Buddha Relics: भारताने भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष रशियाच्या कल्मिकिया (Kalmykia) प्रजासत्ताकामध्ये भाविकांच्या दर्शनासाठी पाठवले आहेत. या अवशेषांचे दर्शन घेण्यासाठी आतापर्यंत 50,000 हून अधिक भाविकांनी श्रद्धेने हजेरी लावली आहे, ज्यामुळे या दोन देशांतील आध्यात्मिक भक्तीभाव आणि सामायिक सांस्कृतिक वारसा प्रभावीपणे दिसून आला आहे.
हे पवित्र अवशेष एलिस्ता (Elista) राजधानीतील गेडेन शेद्दुप चोइकोरलिंग मठात ठेवले आहेत, ज्याला “शाक्यमुनी बुद्धांचे सुवर्ण निवासस्थान” म्हणून ओळखले जाते.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या नेतृत्वाखालील आणि ज्येष्ठ भारतीय भिख्खूंचा समावेश असलेले एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ हे अवशेष एलिस्ता शहरात घेऊन गेले होते.
बौद्ध अनुयायांची मोठी लोकसंख्या असलेला आणि युरोपमधील बौद्ध धर्म प्रमुख असलेला एकमेव प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काल्मिकिया या भागात शिष्टमंडळाने विविध धार्मिक सेवा आणि आशीर्वाद कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
11 ऑक्टोबर रोजी या अवशेषांचे प्रदर्शन सुरू झाल्यापासून तेथे निर्माण झालेला भक्तीभाव लक्षणीय आहे.
भारत-रशियाचे घनिष्ठ संबंध:
रशियन प्रजासत्ताकात पहिल्यांदाच अशा प्रकारचे ऐतिहासिक प्रदर्शन आयोजित केले जात आहे. भारत आणि रशिया यांच्या नागरी संस्कृतींमधील अतिशय घनिष्ठ नातेसंबंधांचा हा एक मोठा दाखला आहे.
या प्रदर्शनामुळे 19 वे कुशोक बाकुला रिनपोशे यांच्या चिरस्थायी वारशाचे पुनरुज्जीवन होत आहे. मंगोलियामध्ये बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करण्यात आणि रशियातील काल्मिकिया, बुरियातिया आणि तुवा या प्रदेशांत बौद्ध धर्माविषयी स्वारस्य निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान होते.
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या बीटीआय विभागाकडून आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट सर्किट, राष्ट्रीय संग्रहालय आणि इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स यांच्या सहकार्याने रशियात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
भारताचा या कार्यक्रमातील सहभाग हा दोन्ही देशांमधील सामायिक बौद्ध वारसा आणि लोकांमधील चिरस्थायी आध्यात्मिक संबंधांचे एक शक्तिशाली प्रतीक आहे.
हे देखील वाचा – Test Twenty in Cricket : क्रिकेटमध्ये आला टेस्ट ट्वेंटी’ हा नवा प्रकार ; पारंपरिक कसोटीची गंभीरता आणि टी-२० चा संगम असणारा नवा फॉर्मेट..