LPG Cylinder Update : पश्चिम आशियातील इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे उद्भवू शकणारी ऊर्जेची टंचाई लक्षात घेता, केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून घरगुती गॅस (LPG) वितरणाच्या नियमात बदल केला आहे. आता ग्राहकांना एकदा गॅस सिलेंडर घेतल्यानंतर दुसरे रिफिल मिळवण्यासाठी किमान २५ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. याआधी हा कालावधी २१ दिवसांचा होता.
साठेबाजीला लगाम आणि उत्पादनावर भर
इराणने ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ अडवल्यामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर देशांतर्गत गॅसची साठेबाजी होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारने सर्व तेल शुद्धीकरण प्रकल्पांना (रिफायनरी) घरगुती गॅसच्या उत्पादनाला प्राधान्य देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, औद्योगिक वापरापेक्षा घरगुती वापरासाठी गॅसचा पुरवठा अधिक राहील याची काळजी घेण्यास सांगितले आहे.
घाबरण्याचे कारण नाही: भारताची स्थिती भक्कम
“भारतीय ग्राहकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही,” असे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे. अमेरिका किंवा इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती अधिक सुरक्षित आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि विमानांच्या इंधनाचा (ATF) पुरेसा साठा उपलब्ध आहे. सध्या देशातील प्रत्येक पेट्रोल पंप सुरळीतपणे सुरू असून इंधनाचा कोणताही तुटवडा नाही.
पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर राहणार?
कच्च्या तेलाचे दर जोपर्यंत १३० डॉलर प्रति बॅरलच्या वर जात नाहीत, तोपर्यंत देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता कमी आहे. सध्या कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर प्रति बॅरलच्या आसपास राहतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारताने स्वतःच्या रिझर्व्ह साठ्यांचे नियोजन चोख ठेवल्यामुळे नागरिकांना सध्या तरी महागाईचा मोठा फटका बसण्याची चिन्हे नाहीत.
इराणमधील परिस्थितीवर सरकार बारकाईने लक्ष ठेवून असून, गरजेनुसार पुढील पावले उचलली जातील. तोपर्यंत केवळ साठेबाजी रोखण्यासाठी हा २५ दिवसांचा नियम लागू करण्यात आला आहे.










