LPG Cylinder Update: गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस म्हणजेच एलपीजी सिलेंडरचा तुटवडा आणि त्याच्या वजनाबाबत सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने सोमवारी सर्व शंका दूर करत सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.
सिलेंडरचे वजन कमी करण्याच्या बातम्या केवळ ‘अफवा’ असल्याचे सरकारने स्पष्ट केले असून, युद्धजन्य परिस्थितीत अडकलेले भारताचे दोन मोठे गॅस टँकर आता मायदेशी परतत असल्याची अधिकृत पुष्टीही केली आहे.
सिलेंडरचे वजन कमी होणार नाही: पेट्रोलियम मंत्रालय
बाजारात गॅसचा साठा मर्यादित असल्याने सरकार 14.2 किलोच्या सिलेंडरऐवजी 10 किलोचा सिलेंडर आणणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, पेट्रोलियम मंत्रालयाने हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी स्पष्ट केले की, “घरगुती सिलेंडरचे वजन कमी करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका.”
समुद्रातून आली आनंदाची बातमी: दोन मोठे टँकर भारताकडे रवाना
एककीडे अफवांना पूर्णविराम मिळाला असताना, दुसरीकडे गॅस पुरवठ्याबाबत शिपिंग मंत्रालयाने सकारात्मक माहिती दिली आहे. पश्चिम आशियातील (मिडल ईस्ट) तणावामुळे ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ मध्ये अडकलेले ‘जग वसंत’ आणि ‘पाइन गैस’ हे दोन भारतीय एलपीजी टँकर आता सुरक्षितपणे भारताकडे निघाले आहेत.
शिपिंग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश सिन्हा यांनी सांगितले की, या दोन टँकर्समध्ये मिळून सुमारे 93,000 मेट्रिक टन एलपीजी असण्याचा अंदाज आहे. या जहाजांनी आपला प्रवास सुरू केला आहे.
हॉर्मुझची सामुद्रधुनी आणि भारताची मुत्सद्देगिरी
फेब्रुवारीच्या अखेरीस अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या युद्धजन्य तणावामुळे इराणने ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ मधून जाणाऱ्या जहाजांवर कडक निर्बंध लादले होते. जागतिक तेल आणि गॅस पुरवठ्यासाठी हा मार्ग अत्यंत संवेदनशील आहे. मात्र, भारताच्या यशस्वी मुत्सद्देगिरीनंतर इराणने भारतीय जहाजांना तिथून जाण्याची परवानगी दिली आहे.










