Teacher suspended for PM Modi mimicry : मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साकेत पुरोहित या एका प्राथमिक शिक्षकाने एका सामाजिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली आणि त्यांच्या बोलण्याच्या शैलीचा वापर करून वाढत्या गॅस किमतींवर भाष्य केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही तासांतच या शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
नक्की काय घडले?
साकेत पुरोहित हे सरकारी प्राथमिक शाळेत शिक्षक असून राज्याच्या ‘आनंद विभागा’च्या स्थानिक केंद्राचे प्रभारी देखील आहेत. एका कार्यक्रमात त्यांनी वाढत्या एलपीजी सिलिंडरच्या किमतींवर विनोदी अंगाने भाष्य केले.
“महागाईमुळे लोकांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागेल,” अशा आशयाचे विधान त्यांनी पंतप्रधानांची नक्कल करत केले होते. हा व्हिडिओ व्हायरल होताच भाजपने यावर आक्षेप घेत जिल्हा प्रशासनाकडे लेखी तक्रार केली.
तडकाफडकी निलंबन
भाजप आमदाराच्या तक्रारीनंतर जिल्हा शिक्षण विभागाने तातडीने चौकशी केली आणि साकेत पुरोहित यांना निलंबित केले. मध्य प्रदेश नागरी सेवा नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कोणतीही कारणे दाखवा नोटीस न बजावता रात्रीच्या वेळी ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप साकेत यांनी केला आहे.
“माझी बाजू ऐकून न घेता केलेली ही कारवाई अन्यायकारक आहे,” असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
आनंद पसरवणारा शिक्षक वादात
साकेत पुरोहित यांची ओळख परिसरात एक समाजसेवक म्हणून आहे. २०१७ पासून ते ‘आनंद विभागा’त मास्टर ट्रेनर म्हणून काम करत आहेत, जिथे कठीण प्रसंगातही आनंद कसा टिकवून ठेवावा, याचे प्रशिक्षण ते देतात.
कोरोना महामारीच्या काळात त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन साडेतीन लाख रुपयांचा निधी उभारून ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था केली होती. त्यावेळी त्यांचे कौतुक झाले होते, मात्र आज एका विनोदावरून त्यांना टीकेचे धनी व्हावे लागत आहे.
साकेत म्हणाले की, “शिक्षकांनाही आपली मते मांडण्याचा अधिकार आहे. अलिकडच्या काळात उपरोध आणि विनोदावरही निर्बंध येत आहेत, हे दुर्दैवी आहे. केवळ एका जोकमुळे शांतता कशी भंग होऊ शकते, हे मला अजूनही समजलेले नाही.” सध्या साकेत यांना त्यांच्या पदावरून हटवून बदरवास येथील कार्यालयाशी संलग्न करण्यात आले आहे.










