Mamata Banerjee on all-party delegation | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी व ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) संदर्भातील माहिती देण्यासाठी परदेशात जाणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळातून टीएमसीचे खासदार युसूफ पठाणने माघार घेतली होती. त्यानंतर आता यावर ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भातील सर्वपक्षीय शिष्टमंडळात युसूफ पठाण (Yusuf Pathan) यांचा समावेश करण्यापूर्वी केंद्राने तृणमूल काँग्रेसला कोणतीही पूर्वसूचना दिली नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
तृणमूलने पठाण यांना शिष्टमंडळातून माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर ममता बॅनर्जीपत्रकारांशी बोलत होत्या. त्यांनी स्पष्ट केलं की, “आम्हाला शिष्टमंडळात सहभागी व्हायचं नव्हतं, असं नाही. पण सध्याची केंद्राची प्रणाली अशी आहे की मूळ पक्षाला न विचारता फक्त संसदीय पक्षाशीच संवाद साधला जातो.”
त्यांनी हेही सांगितलं की, संसद सदस्यांना अशा निर्णयांचा अधिकार नसतो, तर तो पक्षाच्या नेतृत्वाकडे असतो. “संसद सध्या सुरू नाही, त्यामुळे असा निर्णय घेण्याआधी आमच्याशी सल्लामसलत व्हायला हवी होती,” असं बॅनर्जी म्हणाल्या.
पक्ष बहिष्कार टाकणार नाही हे स्पष्ट करताना त्यांनी सांगितलं की, “आम्ही सरकारसोबत आहोत. राष्ट्रीय सुरक्षेच्यामुद्यावर आम्ही राजकारण करत नाही.”
तृणमूलचे राष्ट्रीय महासचिव आणि लोकसभा सदस्य अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांनीही यावर प्रतिक्रिया देताना विचारलं, “तृणमूलचं प्रतिनिधित्व कोण करेल हे केंद्र किंवा भाजप (BJP) कसं ठरवू शकतं? विरोधी पक्षांशी चर्चा न करता घेतलेला निर्णय योग्य नाही.”
दुसरीकडे, बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांत मजुमदार (Sukanta Majumdar) यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं, “शिष्टमंडळ हे सरकारचं प्रतिनिधित्व करतं, राजकीय पक्षाचं नाही. आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर निर्णय घेताना राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे.”
दरम्यान, भारताकडून ऑपरेशन सिंदूरनंतरची देशाची भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ विविध देशात जाणार आहे. या शिष्टमंडळात आधी खासदार युसूफ पठाण यांचाही समावेश करण्यात आला होता. मात्र, नंतर त्यांनी या काळात उपलब्ध नसल्याचे सांगत शिष्टमंडळात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.