Bilawal Bhutto on Masood Azhar | पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुट्टो झरदारी (Bilawal Bhutto) यांनी जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर (Masood Azhar)याच्या ठावठिकाण्याबाबत पाकिस्तानला माहिती नसल्याचा धक्कादायक दावा केला आहे. भारताने जर अझहर पाकिस्तानात असल्याची माहिती दिली, तर त्याला अटक करण्यात आनंद होईल, असेही त्यांनी म्हटले.
भारताच्या मोस्ट-वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक असलेल्या अझहरवर 2001 चा संसद हल्ला, 2016 चा पठाणकोट हल्ला आणि 2019 चा पुलवामा हल्ला यांसारख्या दहशतवादी कारवायांचा आरोप आहे.
एका मुलाखतीत बोलताना बिलावल भुट्टो म्हणाले की, “हाफिज सईद मोकळा नसून तो पाकिस्तानी सरकारच्या ताब्यात आहे. मसूद अझहरबाबत आम्हाला त्याचा ठावठिकाणा माहिती नाही. कदाचित तो अफगाणिस्तानात असेल.” त्यांनी भारताने मसूद अझहर पाकिस्तानात असल्याची माहिती दिल्यास त्याला अटक करण्याची तयारी दर्शवली.
तसेच, त्यांनी दहशतवादविरोधी सहकार्यासाठी माहितीच्या देवाणघेवाणीवर भर दिला. “जेव्हा दोन देशांमध्ये दहशतवादविरोधी सहकार्य असते, तेव्हा माहितीच्या आधारे कारवाई होते,” असे ते म्हणाले. त्यांनी अफगाणिस्तानातील तालिबानच्या सत्तेला पश्चिमी देशांचा पाठिंबा असल्याचा आरोप करत, नाटोला (NATO) अप्रत्यक्षपणे जबाबदार ठरवले.
“जिथे मसूद अझहरचा संबंध आहे, जर तो अफगाणिस्तानात असेल, तर पश्चिमेने आता अशा गटाला सत्ता दिली आहे ज्यांना ते एकेकाळी दहशतवादी म्हणत होते आणि आता त्यांना अफगाणिस्तानचे प्रभारी म्हणतात… नाटो (NATO) जे अफगाणिस्तानात करू शकले नाही, ते पाकिस्तानाला जाऊन करणे शक्य नाही. पाकिस्तानला या व्यक्तीला किंवा कोणत्याही संबंधित व्यक्तीला सक्रिय पाहण्याची इच्छा असण्याचे कोणतेही कारण नाही.”, असे भुट्टो म्हणाले.
दरम्यान, मसूद अझहर हा जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक आहे. 1999 मध्ये कंदाहार विमान अपहरणानंतर त्याला प्रवाशांच्या बदल्यात सोडण्यात आले होते. 2019 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) त्याला जागतिक दहशतवादी घोषित केले. भारताने अझहर आणि लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद यांना ताब्यात देण्याची सातत्याने मागणी केली आहे. मात्र, पाकिस्तान पुरावे असतानाही याबाबत अनभिज्ञता दाखवत आहे.