तिरुवल्लूरमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला आग

Massive Fire on Goods Train in Tiruvallur

चेन्नई – तामिळनाडूमधील तिरुवल्लूर रेल्वे स्थानकाजवळ (Tiruvallur Railway Station) आज सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास डिझेल वाहून नेणाऱ्या मालगाडीच्या चार डब्यांना अचानक आग (Goods Train Fire) लागली. ती इतकी भीषण होती की आकाशात उंच ज्वाळा आणि काळ्या धुराचे लोट पसरले होते. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन (fire brigade) आणि आपत्कालीन बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि अथक प्रयत्नांनंतर त्यांनी आग आटोक्यात आणली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि आसपासच्या मालमत्तेलाही कोणतीही हानी पोहोचलेली नाही. मात्र, डिझेल अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे आग विझवणे खूपच अवघड होते.

ही मालगाडी मनालीहून तिरुपतीच्या दिशेने जात होती. आग लागल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव आसपासच्या परिसरातील रहिवाशांना बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे या मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या आगीचा सर्वात जास्त फटका चेन्नईहून जाणाऱ्या आणि येणाऱ्या रेल्वेसेवेला बसला आहे. दक्षिण रेल्वेने चेन्नईहून सुटणाऱ्या आठ गाड्या रद्द केल्या तर पाच गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला.