Meghalaya Coal Mine Blast: मेघालयातील पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील थांगस्काई भागात असलेल्या एका बेकायदेशीर कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला असून, या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 18 वर पोहोचला आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून मदतकार्य अद्यापही सुरू आहे.
नेमकी घटना काय?
पोलीस अधीक्षक विकास कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमप्लिंग पोलीस चौकीच्या हद्दीतील एका बेकायदेशीर खाणीत हा स्फोट झाला. माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. खाणीच्या आत अनेक मजूर अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. शोध मोहिमेदरम्यान आतापर्यंत 18 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या स्फोटात एक कामगार गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
बचावकार्य आणि कायदेशीर कारवाई
सध्या घटनास्थळी एनडीआरएफ (NDRF), एसडीआरएफ (SDRF) आणि विशेष बचाव पथके (SRT) तैनात आहेत. याप्रकरणी खलिहरियात पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, खाण आणि खनिज कायदा तसेच स्फोटक पदार्थ कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर खाणकाम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून, आरोपींची माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
पंतप्रधानांकडून मदतीचा हात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमी व्यक्तीला 50,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. “मेघालयातील या दुर्घटनेने व्यथित झालो आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या प्रति संवेदना व्यक्त करतो,” असे पोस्ट पंतप्रधान कार्यालयाने केले आहे.
राज्य सरकारचा चौकशीचा आदेश
मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. ही खाण बेकायदेशीर असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, याला जबाबदार असणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. “नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांशी कोणताही करार केला जाणार नाही, दोषींवर कडक कायदेशीर कारवाई होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.









