राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, बेपत्ता सोनम सापडली; तिघांना अटक

Raja Raghuvanshi

Raja Raghuvanshi | मध्यप्रदेशमधील इंदूरच्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी (Raja Raghuvanshi) यांच्या हत्येप्रकरणात अखेर पोलिसांना मोठे यश आहे. या प्रकरणात राजा रघुवंशीची पत्नी सोनमसह 3 जणांना अटक करण्यात आले आहे. एकजण अद्याप फरार आहे.

मेघालयमध्ये पर्यटक म्हणून गेलेल्या राजा आणि त्यांची पत्नी सोनम हे 22 मेपासून बेपत्ता होते. 2 जून रोजी राजा यांचा मृतदेह चेरापुंजीजवळील दरीत सापडल्यानंतर त्यांची हत्या झाल्याचे समोर आले होते. मात्र सोनमचा तपास लागलेला नव्हता. अखेर, आज पोलिसांनी सोनसह 3 हल्लेखोरांना अटक केली आहे.

मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी ‘एक्स’ (ट्विटर) पोस्टद्वारे याप्रकरणी मोठी कारवाई झाल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, मध्य प्रदेशातील 3 हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे, तर एका महिलेने आत्मसमर्पण केले आहे. पोलीस अजून एका आरोपीचा शोध घेत आहेत.

मेघालयचे डीजीपी यांनी सांगितले की, आत्मसमर्पण केलेली महिला म्हणजे मृत राजा रघुवंशी यांची पत्नी सोनम रघुवंशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. महिलेने स्वतः गाझीपूरमध्ये असल्याची माहिती फोनकरून घरच्यांना दिली होती. त्यानंतर तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. महिलेला उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील ‘सखी वन स्टॉप सेंटर’मध्ये ठेवण्यात आले आहे.

या प्रकरणातील गूढ अधिक खोल जात असून, रघुवंशी कुटुंबाने यासंदर्भात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीबीआय (CBI) चौकशीसाठी पत्र लिहिले आहे. राजा रघुवंशीचे भाऊ विपुल रघुवंशी यांनी पंतप्रधान कार्यालयात ही विनंती सादर केली आहे.

राजा आणि सोनम रघुवंशी नवविवाहित जोडपे होते. ते ईशान्य भारतात हनिमूनसाठी गेले होते. त्यानंतर त्यांचा अचानक संपर्क तुटला. 2 जून रोजी राजा यांचा मृतदेह चेरापुंजीजवळील सोहरारिम येथे सापडला. सोनम अद्याप बेपत्ता होती, मात्र तिच्या आत्मसमर्पणामुळे प्रकरणात नवे वळण आले आहे.

सोनमच्या आई संगीता रघुवंशी यांनी सीबीआय चौकशी लवकर सुरू व्हावी, जेणेकरून मुलगी घरी परतू शकेल, अशी भावना एएनआयशी बोलताना व्यक्त केली. सध्या आरोपींची चौकशी सुरू असून, हत्या कुठल्या कारणाने झाली आणि सोनमची नेमकी भूमिका काय आहे, हे तपासाअंती स्पष्ट होणार आहे.