Mehul Choksi Extradition : फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये मोठा धक्का बसला आहे. प्रत्यार्पणाला आव्हान देणारी त्याची अपील बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. यामुळे चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
17 ऑक्टोबर रोजी अँटवर्प कोर्ट ऑफ अपीलने भारताची प्रत्यार्पणाची विनंती कायम ठेवली होती आणि हा न्यायालयीन आदेश लागू करण्यास योग्य असल्याचे म्हटले होते. यानंतर चोक्सीने ऑक्टोबरमध्ये बेल्जियममधील सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. अपील न्यायालयाने घेतलेला हा निर्णय प्रत्यार्पणाच्या प्रदीर्घ कायदेशीर प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात होता.
पीएनबीघोटाळा आणि कायदेशीर संघर्ष
अनेक कोटींच्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्याप्रकरणी चोक्सी भारतात फरार आहे आणि तो 2018 पासून परदेशात प्रत्यार्पणाच्या कारवाईशी लढा देत आहे.
भारताच्या विनंतीवरून चोक्सीला एप्रिलमध्ये बेल्जियमच्या अधिकाऱ्यांनी अँटवर्पमध्ये अटक केली आणि तेव्हापासून तो तेथील तुरुंगात आहे. त्याने केलेली जामीन अर्ज अर्ज न्यायालयाने फेटाळला, कारण तो पळून जाण्याचा धोका निर्माण करू शकतो.
चोक्सीने त्याच्या वकिलांमार्फत प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (पी एम एल ए) अंतर्गत एका विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्याला फरार आर्थिक गुन्हेगार (एफईओ) म्हणून घोषित करण्याच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अर्जाला रद्द करण्याची मागणी त्याने केली होती. मात्र, गेल्या महिन्यात मुंबईतील एका विशेष न्यायालयाने त्याचा हा अर्ज फेटाळला.
घोटाळ्याची व्याप्ती
चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी हे अनेक कोटींच्या या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहेत. या घोटाळ्याची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि ईडी करत आहेत.
मुंबईतील पीएनबीच्या ब्रॅडी हाऊस शाखेतील अधिकाऱ्याला लाच देऊन त्यांनी लेटर्स ऑफ अंडरटेकिंग (एल ओ यू) आणि फॉरेन लेटर्स ऑफ क्रेडिट (एफएलसी) चा वापर करून 13,000 कोटींहून अधिक सार्वजनिक पैसा हडपल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. नीरव मोदी सध्या लंडनच्या तुरुंगात असून तोही प्रत्यार्पणापासून वाचण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करत आहे.









