‘मला वेश्यासारखी वागणूक…’, मिस वर्ल्ड स्पर्धेतील ब्रिटिश स्पर्धकाचा आरोप

Miss World Event

हैद्राबाद – हैद्राबाद इथे सुरु असलेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेदरम्यान अनेक गैरप्रकार होत असल्याचा आरोप करत या स्पर्धेतील ब्रिटिश मॉडेल मिला मागी हिने स्पर्धेतून माघार घेतली आहे. या स्पर्धेतील आयोजनावर तिने केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी तेलंगणाचे मंत्री केटी रामा राव यांनी केली आहे. मिलाच्या समर्थनासाठी त्यांनी आपल्या समाजमाध्यमावर एक पोस्ट लिहिली आहे.

या स्पर्धेतून बाहेर पडताना मालीने स्पर्धेच्या आयोजकांवर गंभीर आरोप केले.  तिने म्हटले होते की, आयोजक दिवसभर गाऊनमध्येच बसवून ठेवतात. ब्रेकफास्ट करतानाही हाच गाऊन घालावा लागत असे. त्याचबरोबर या स्पर्धेला आर्थिक मदत करणाऱ्या एका मध्यमवयीन व्यक्तीबरोबर वावरण्याची सक्तीही करण्यात आली होती. स्पर्धेतून बाहेर पडताना तिने म्हटले होते की, मी इथे काहीतरी नवीन करायला आले होते. पण मला इथे माकडासारखे खेळ करावे लागले. त्यामुळे नैतिक दृष्टीने मी अशा स्पर्धेचा भाग होऊ शकत नाही.  

तिने आयोजकांवर केलेल्या आरोपाची चौकशी करण्याची मागणी करताना मंत्री केटी रामा राव यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून बाहेर पडण्यासाठी  व महिलाविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी फार मोठे साहस लागते. तू एक सक्षम स्त्री आहे. मिला मागी… मला तुझा अभिमान वाटतो. आमच्या तेलंगणात तुला हा अनुभव आल्याबद्दल मला वाईट वाटते. तेलंगणा हे महिलांचा सन्मान करणारे हे एक समृद्ध  राज्य आहे. आम्ही महिलांचा सन्मान करतो. त्यांना मोठे होण्याची समान संधी देतो. आमच्याकडे राणी रुद्रम्मा व चितयाला अलिअम्मा यांच्यासारख्या मोठ्या महिला नेत्या होऊन गेल्या आहेत. तुम्हाला जो वाईट अनुभव आला, तो खरा  तेलंगणा नाही. तुला आता बरे वाटत असेल. एका मुलीचा बाप म्हणून कोणत्याही मुलीने अशा प्रकारच्या अनुभवातून जाऊ नये असे मला वाटते. त्याचबरोबर मी अशी वर्तणूक देणाऱ्या आयोजकांचा निषेध करत आहे. याची चौकशी करण्याची मागणीही करत आहे.