Modi’s Mission Book: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित ‘मोदीज मिशन’ हे पुस्तक प्रत्येक भारतीयाने वाचण्यासारखे आहे. या पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केल्यास, भावी पिढीला मोठी प्रेरणा मिळेल, अशी मागणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत राजभवन येथे लेखक बर्जिस देसाई यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपले मत स्पष्टपणे मांडले.
मोदींचे व्यक्तिमत्त्व, समर्पण आणि दूरदृष्टी
शिंदे म्हणाले की, मोदींच्या जीवनावर अनेक पुस्तके आणि चित्रपट आले आहेत, पण ‘मोदीज मिशन’ हे केवळ एक चरित्र नसून, त्यांच्या संघर्षाचा, कामाच्या दृष्टीकोनाचा आणि कठोर परिश्रमाचा आरसा आहे.
त्यांच्या मते, नरेंद्र मोदी हे नाव आता केवळ देशाचे वर्तमान नाही, तर ते देशाचे भविष्य आहे. मोदींनी गेल्या 11 वर्षांत खऱ्या अर्थाने ‘अशक्य’ वाटणारी अनेक कामे शक्य करून दाखवली आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या आईकडून मिळालेले संस्कार हे मोदींच्या कामाचे मुख्य स्त्रोत आहेत. त्यांचे समर्पण आणि निष्ठा वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या मेहनतीमुळेच गुजरातच्या एका छोट्याशा गावातून आलेला हा नेता आज करोडो गरिबांचे जीवनमान उंचावत आहे.
◻️LIVE📍राजभवन, मुंबई 🗓️ 24-10-2025 📹 मा. राज्यपाल महोदयांच्या उपस्थितीत 'मोदीज मिशन' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा – लाईव्ह
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 24, 2025
https://t.co/WnRyM5ismL
आर्थिक क्रांती आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन
पंतप्रधानांच्या कारकिर्दीतील आर्थिक प्रगतीवर भाष्य करताना शिंदे म्हणाले, “आज भारताची अर्थव्यवस्था जगातील 11 व्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे आणि लवकरच ती तिसऱ्या क्रमांकावर येईल. डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत यांसारख्या योजनांनी भारताला जगात नवी ओळख दिली आहे.”
ते पुढे म्हणाले की, मोदींनी 25 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या बाहेर काढले आहे. पूर्वी ‘गरीबी हटाव’चा नारा दिला गेला, पण गरीबी हटली नाही; मात्र मोदींनी खऱ्या अर्थाने गरिबी हटवली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या 11 वर्षांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचा एकही डाग त्यांच्यावर लागला नाही.
‘हा तर केवळ ट्रेलर’
शिंदे यांनी या पुस्तकाचे लेखक बर्जिस देसाई यांचे अभिनंदन केले. टीका करणारे काम करत राहतील, पण मोदीजी काम थांबवणार नाहीत. ‘सबका साथ, सबका विकास’ हाच देशाचा विकास मंत्र आहे. लोकांच्या हृदयावर राज्य करणारा नेता कोण आहे, याचे उत्तर आज फक्त एकच आहे— नरेंद्र मोदी! त्यांच्या 11 वर्षांच्या कार्यकाळानंतरही, ‘हा तर केवळ ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे,’ असे सूचक विधान एकनाथ शिंदे यांनी केले.
हे देखील वाचा – Smriti Mandhana : एकाच वर्षात 5 शतके, 31 षटकार: स्मृती मानधनाने एका सामन्यात मोडले ‘हे’ मोठे वर्ल्ड रेकॉर्ड्स









