Mohan Bhagwat | भारताच्या सर्व सीमांवर सध्या दुष्ट शक्तींचे दुष्टकृत्य सुरू असून देशाने स्वतःच शक्तिशाली बनण्याशिवाय पर्याय नाही, असे परखड मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी व्यक्त केले आहे.
आरएसएसशी संबंधित साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’ (Organiser) च्या नवीनतम अंकात प्रकाशित झालेल्या मुलाखतीत भागवत म्हणाले, “जगात अशा दुष्ट शक्ती आहेत ज्यांचा स्वभाव आक्रमक आहे. आपल्या सर्व सीमांवर आपण दुष्ट शक्तींचे दुष्टकृत्य पाहत आहोत, त्यामुळे आपल्याकडे शक्तिशाली बनण्याशिवाय कोणताही पर्याय नाही.”
ही मुलाखत 22 एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam terror attack) पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या अचूक हल्ल्यांनंतर (Operation Sindoor) घेण्यात आली.
भागवत यांनी स्पष्ट केले की, खरी ताकद ही बाह्य नव्हे, तर आंतरिक असते. “आपण इतके सक्षम असले पाहिजे की, अनेक शक्ती एकत्र आल्या तरी कोणीही आपल्याला जिंकू शकणार नाही.” भागवत यांनी हिंदू समाजात एकतेची हाक दिली आणि ‘भारता’ला लष्करी सामर्थ्य आणि अर्थव्यवस्थेत इतके बलवान बनवण्याचे आवाहन केले की “अनेक शक्ती एकत्र आल्या” तरी त्याला ‘जिंकता’ येऊ नये. मात्र, त्यांनी यावर जोर दिला की, सामर्थ्यासोबत सद्गुण आणि धर्माचे पालन करणे आवश्यक आहे, कारण “केवळ क्रूर शक्ती” दिशाहीन होऊन ‘घोर हिंसाचारा’ला जन्म देऊ शकते.
ते म्हणाले, “हिंदू समाजाचे संघटन अद्याप अपूर्ण आहे. आपल्याला केवळ सैनिकी दृष्टिकोनातून नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही बलवान व्हावे लागेल. पण त्यासोबतच सद्गुण आणि धार्मिक मूल्यांचे पालनही अत्यावश्यक आहे. अन्यथा, ‘केवळ क्रूर शक्ती’ हिंसेकडे नेऊ शकतात.” हिंदू समाजाला मजबूत करण्याचे काम सुरू आहे, पण ते अजून पूर्ण झालेले नाही, असेही ते म्हणाले.
भागवतांनी बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविरुद्ध भारतात व्यक्त झालेल्या आक्रोशाचीही विशेष दखल घेतली. “तेथील हिंदू आता म्हणतात – आम्ही पळणार नाही. आमच्या हक्कांसाठी लढू.”
पुढील 25 वर्षांसाठी आरएसएसचा उद्देश स्पष्ट करताना भागवत म्हणाले, “संपूर्ण हिंदू समाज एकत्र आणणे, भारताला वैभवाच्या शिखरावर नेणे आणि ते परिवर्तन जगभर पोहोचवणे, हाच आमचा संकल्प आहे.”