Monsoon 2026 : भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या मान्सूनबाबत यंदा चिंतेची बातमी समोर येत आहे. ‘स्कायमेट’ (Skymet) या खाजगी हवामान संस्थेने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, २०२६ मध्ये भारतात मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत दीर्घकालीन सरासरीच्या (८६८.६ मिमी) केवळ ९४ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या कमी पावसाचे मुख्य कारण म्हणजे पॅसिफिक महासागरात निर्माण होणारी ‘एल निनो’ (El Nino) ही हवामान स्थिती असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘एल निनो’चा वाढता धोका
स्कायमेटच्या अहवालानुसार, मान्सूनच्या सुरुवातीचा काळ म्हणजेच जून महिना तुलनेने स्थिर राहील; मात्र हंगामाच्या उत्तरार्धात म्हणजेच जुलै ते सप्टेंबर या काळात एल निनोची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. ‘एल निनो’ म्हणजे पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा अधिक वाढणे. या नैसर्गिक बदलाचा भारतीय मान्सूनवर नकारात्मक परिणाम होऊन पावसाचे प्रमाण घटते. याउलट ‘ला निना’ स्थिती असल्यास पाऊस चांगला होतो, मात्र यंदा एल निनोचे सावट अधिक गडद दिसत असल्याने पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे.
शेती आणि अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने
भारताच्या एकूण वार्षिक पावसापैकी जवळपास ७० टक्के पाऊस हा नैऋत्य मान्सूनच्या माध्यमातून मिळतो. देशातील १४० कोटींहून अधिक लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक जनता आजही उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. खरीप हंगामातील पेरण्या प्रामुख्याने जून आणि जुलै महिन्यात होतात. जर जुलै ते सप्टेंबर या काळात पावसाने ओढ दिली, तर त्याचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनावर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. विशेषतः मध्य आणि उत्तर-पश्चिम भारतातील राज्यांमध्ये पावसाची लक्षणीय कमतरता भासू शकते, ज्यामुळे जलसाठ्यांच्या पातळीतही घट होण्याची भीती आहे.
मान्सूनचे वेळापत्रक आणि आगामी अंदाज
साधारणपणे मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो आणि १५ जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो. स्कायमेटने आपला अंदाज जाहीर केला असला, तरी आता सर्वांच्या नजरा भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अधिकृत अंदाजाकडे लागल्या आहेत. हवामान विभाग पुढील आठवड्यात मान्सूनचा आपला पहिला अधिकृत प्राथमिक अंदाज जाहीर करण्याची शक्यता आहे. या अंदाजानंतरच यंदाच्या पावसाळी हंगामाचे अधिक स्पष्ट चित्र समोर येईल आणि सरकारला त्या दृष्टीने आपत्कालीन नियोजन करणे सोपे जाईल.











