NASA Artemis 2: अंतराळ संशोधनाच्या इतिहासात1 एप्रिल हा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिला जाण्याची शक्यता आहे. तब्बल ५२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, नासा (NASA) आपले ‘आर्टेमिस २’ (Artemis 2) हे पहिले मानवी चंद्र मिशन प्रक्षेपित करण्यासाठी सज्ज झाले आहे.
फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट ‘स्पेस लॉन्च सिस्टम’ (SLS) च्या मदतीने चार अंतराळवीर चंद्राच्या दिशेला झेपावणार आहेत.
प्रक्षेपणाची वेळ आणि तारीख
नासाने या मोहिमेसाठी १ एप्रिल ही तारीख निश्चित केली आहे. भारतीय वेळेनुसार (IST), हे प्रक्षेपण २ एप्रिल रोजी पहाटे ३:५४ वाजता होणार आहे. प्रक्षेपणासाठी २ तासांची ‘विंडो’ उपलब्ध असेल, म्हणजेच काही कारणास्तव उशीर झाल्यास पहाटे ५:५४ पर्यंत रॉकेट सोडले जाऊ शकते. जर हवामानाने साथ दिली नाही, तर १ ते ६ एप्रिल दरम्यान दररोज प्रक्षेपणाची संधी उपलब्ध आहे.
हे मिशन किती दिवसांचे असेल?
‘आर्टेमिस २’ ही १० दिवसांची चाचणी मोहिम आहे. यामध्ये अंतराळवीर चंद्रावर उतरणार नाहीत, तर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून पुन्हा पृथ्वीवर परततील.
- प्रवास: चंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी ४ दिवस आणि परत येण्यासाठी ४ दिवस लागतील. २ दिवस पृथ्वीच्या कक्षेत घालवले जातील.
- उद्देश: ओरियन कॅप्सूलमधील जीवनरक्षक प्रणाली, दळणवळण आणि नेव्हिगेशनची तपासणी करणे.
- पुढील पाऊल: ही मोहीम यशस्वी झाल्यास, २०२८ मध्ये ‘आर्टेमिस ४’ अंतर्गत मानव पुन्हा एकदा चंद्राच्या जमिनीवर पाऊल ठेवेल.
ऐतिहासिक अंतराळवीर चमू
या मोहिमेत चार अंतराळवीरांचा समावेश आहे, जे इतिहासात आपली नावे नोंदवणार आहेत:
- रीड वाईजमन: मोहिमेचे कमांडर.
- व्हिक्टर ग्लोव्हर: चंद्राच्या दिशेने जाणारे पहिले कृष्णवर्णीय अंतराळवीर.
- क्रिस्टीना कोच: चंद्राच्या जवळ जाणारी पहिली महिला अंतराळवीर.
- जेरेमी हॅन्सन: कॅनेडियन स्पेस एजन्सीचे पहिले बिगर-अमेरिकन अंतराळवीर.
थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?
तुम्ही या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार घरबसल्या होऊ शकता. नासाच्या अधिकृत वेबसाइटसह NASA+, YouTube, Netflix आणि Amazon Prime वर याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. इंधन भरण्याची प्रक्रिया १ एप्रिल रोजी संध्याकाळपासूनच (भारतीय वेळेनुसार) पाहायला मिळेल, तर मुख्य काऊंटडाऊन रात्री उशिरा सुरू होईल.










