Bank Strike : बँक ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटी सलग 3 दिवस बँकांचे कामकाज ठप्प राहण्याची शक्यता आहे. विविध मागण्यांसाठी बँक कर्मचारी संघटनांच्या संयुक्त मंचाने (UFBU) 27 जानेवारी 2026 रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे.
विशेष म्हणजे, या संपाच्या आधी 25 जानेवारी (रविवार) आणि 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन) या सार्वजनिक सुट्ट्या आहेत, ज्यामुळे सलग 3 दिवस बँक शाखांचे दरवाजे बंद राहू शकतात.
संपाचे मुख्य कारण काय?
बँक कर्मचाऱ्यांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ‘आठवड्यातून 5 दिवस काम’ (5-Day Work Week) या मागणीसाठी हा संप पुकारला गेला आहे. सध्या बँकांमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. मात्र, सर्व शनिवार सुट्टी जाहीर करून सोमवार ते शुक्रवार अशा कामकाजाच्या वेळा निश्चित कराव्यात, अशी संघटनांची प्रमुख मागणी आहे.
आरबीआय, एलआयसी आणि सरकारी कार्यालयांमध्ये आधीच हा नियम लागू असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. यासाठी कर्मचारी रोज वाढीव 40 मिनिटे काम करण्यासही तयार आहेत.
या सेवांवर होणार परिणाम
27 जानेवारीच्या संपामुळे विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील (सरकारी) बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम होईल. यामध्ये खालील सेवा विस्कळीत होऊ शकतात:
- चेक क्लिअरन्स: तेर जमा करणे किंवा वटवणे या प्रक्रियेत उशीर होईल.
- रोख व्यवहार: बँक शाखेतून पैसे काढणे किंवा जमा करणे शक्य होणार नाही.
- केवायसी आणि कागदपत्रे: केवायसी अपडेट करणे किंवा नवीन खाती उघडण्याचे काम थांबेल.
- लॉकर सुविधा: संपाच्या काळात बँक लॉकरचा वापर करता येणार नाही.
- एटीएम सेवा: संपाच्या काळात एटीएममधील रोकड संपल्यास ती पुन्हा भरण्यास विलंब होऊ शकतो.
ग्राहकांसाठी महत्त्वाच्या टिप्स
कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी खालील तयारी करणे गरजेचे आहे:
- रोख रकमेची सोय: 24 जानेवारी शुक्रवारपर्यंत आवश्यक रोख रक्कम काढून ठेवा.
- महत्त्वाची कामे उरका: डीडी काढणे किंवा मोठे व्यवहार 23-24 जानेवारीलाच पूर्ण करा.
- डिजिटल बँकिंग: संपाच्या काळात यूपीआय (UPI), इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सेवा सुरू राहतील, त्यामुळे ऑनलाइन व्यवहारांना प्राधान्य द्या.
खाजगी बँकांमध्ये या संपाचा प्रभाव कमी असू शकतो, मात्र सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये व्यवहार पूर्णपणे ठप्प राहण्याची चिन्हे आहेत.
हे देखील वाचा – Healthy Breakfast: चक्क नाश्त्यात खा ‘चॉकलेट केक’! फक्त 7 साहित्यात तयार होणारी ही हाय-प्रोटिन रेसिपी एकदा नक्की ट्राय करा











