नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असलेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या बैठक पार काढली. या बैठकीत ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैन्यदल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करणारा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना बिहार निवडणूक, सुशासन व इतर मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील रालोआची ही पहिलीच बैठक होती.
या बैठकीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल ठराव मांडला. या ठरावात भारताच्या संरक्षण दलांच्या शौर्यपूर्ण कारवायांचे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक, धैर्यशील आणि राष्ट्रहिताचे नेतृत्व यांचे विशेष कौतुक करण्यात आले. सर्व उपस्थित एनडीए घटक पक्षांच्या नेत्यांनी या ठरावाला एकमताने पाठिंबा दिला.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यांना ही माहिती दिली. या बैठकीत जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात येऊन सरकारच्या या निर्णयाची प्रशंसा करण्यात आली. यावेळी मोदींनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हटले की, नेत्यांनी कारण नसताना कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला दूर राहावे. जातीनिहाय जनगणनेच्या माध्यमातून समाजातील मागासवर्गीयांना मुख्य प्रवाहात आणण्यात येईल. ऑपरेशन सिंदूर देशाच्या स्वावलंबनाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.
या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, देशात नक्षलवादाच्या विरोधात मोहीम सुरु आहे. आम्ही नक्षलवादाला हरवण्यासाठी आमच्या शक्तीचा योग्य वापर केला. यावेळी छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी नक्षलवादाविरोधातील लढ्याचे अनुभव सांगितले.