Nepal Voting Age: नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान सुशीला कार्की यांनी देशाला संबोधित करताना मोठी घोषणा केली आहे. Gen-Z आंदोलनानंतर राजकारणात तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी मतदानाचे किमान वय 18 वरून 16 वर्षे करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावे, या तरुणांच्या मागणीला प्रतिसाद देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
12 सप्टेंबर रोजी पदभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांच्या शिफारशीनुसार कार्की यांनी 5 मार्च 2026 रोजी होणाऱ्या आगामी संसदीय निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे.
Gen-Z आंदोलनामुळे मोठा निर्णय
Gen-Z आंदोलनामुळे देशात निर्माण झालेल्या राजकीय अनिश्चिततेनंतर के. पी. शर्मा ओली यांना पंतप्रधान पदावरून हटवण्यात आले होते. भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदी यांसारख्या मुद्द्यांवरून तरुणांनी हे हिंसक आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि नागरिकांसह 74 लोकांचा मृत्यू झाला होता.
या गुंतागुंतीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सरकारने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळ, अर्थसंकल्प, साहित्य आणि कायदेशीर व्यवस्था करण्याचे प्राथमिक काम सुरू केले आहे. कार्की यांनी सांगितले की, 18 वर्षांपर्यंत पोहोचलेल्या तरुण पिढीला मतदानाचा अधिकार देण्यासाठी आणि मतदार यादी वाढवण्यासाठी सध्याच्या निवडणूक कायद्यात वटहुकूम काढून सुधारणा करण्यात आली आहे.
शांततेचे आवाहन आणि कठोर कारवाईची ग्वाही
पंतप्रधान सुशीला कार्की यांनी देशभरातील नागरिकांना आगामी निवडणुकीत उत्साहाने भाग घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, त्यांनी सर्व राजकीय पक्ष, नागरी समाज आणि प्रसारमाध्यमांना मुक्त, भयमुक्त आणि निष्पक्ष निवडणुका यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग घेण्याची विनंती केली.
Gen-Z आंदोलनादरम्यान झालेल्या 74 लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांवर सरकार कठोर कारवाई करेल, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. शांततापूर्ण वातावरण निवडणुकीसाठी आवश्यक आहे, त्यामुळे सर्वांनी संयमाने शांतता राखण्याचे आवाहनही त्यांनी केले.
हे देखील वाचा – ‘मला ट्रोल करणाऱ्या लोकांना…’; अमृता फडणवीस यांचे ट्रोलर्सला सडेतोड उत्तर