Home / देश-विदेश / ‘दुचाकी वाहनांना टोल भरावा लागणार नाही’, नितीन गडकरी आणि NHAI ने स्पष्टच सांगितले

‘दुचाकी वाहनांना टोल भरावा लागणार नाही’, नितीन गडकरी आणि NHAI ने स्पष्टच सांगितले

Two-wheeler Toll Tax

Two-wheeler Toll Tax | राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल टॅक्स लावला जाणार असल्याच्या बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) स्पष्ट केले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही या अफवांना ‘दिशाभूल करणाऱ्या’ म्हणत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर माहिती दिली.

सोशल मीडियावर दुचाकी वाहनांनाही आता टोल भरावा लागणार असल्याची माहिती काही यूजर्सकडून शेअर केली जात होती. मात्र, NHAI ने ही माहिती खोटी असल्याचे स्पष्ट केले.

NHAI ने आपल्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवर माहिती दिली की की, “काही प्रसारमाध्यमांनी दुचाकी वाहनांवर टोल शुल्क आकारण्याच्या बातम्या पसरवल्या आहेत. आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. दुचाकी वाहनांना टोलमधून पूर्णपणे सूट कायम राहील. यामुळे दुचाकीस्वारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही ‘एक्स’वर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “काही प्रसारमाध्यमे दुचाकींवर टोल टॅक्स लावण्याच्या खोट्या बातम्या पसरवत आहेत. असा कोणताही निर्णय प्रस्तावित नाही. दुचाकींना टोलमधून सूट देण्याची सध्याची नीती कायम राहील. सत्य तपासल्याशिवाय सनसनाटी बातम्या पसरवणे हे चांगल्या पत्रकारितेचे लक्षण नाही. मी याचा तीव्र निषेध करतो.” गडकरींच्या या स्पष्ट शब्दांनी अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

फास्टॅग-आधारित वार्षिक पास योजना

दरम्यान, सरकारने राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवाशांसाठी एक नवी ‘फास्टॅग-आधारित वार्षिक पास’ योजना जाहीर केली आहे. र, ही योजना 15 ऑगस्ट 2025 पासून लागू होण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत, प्रवासी फक्त 3,000 रुपये वार्षिक शुल्क भरून राष्ट्रीय महामार्गांवरील 200 टोल प्लाझा पार करू शकतील.