मुंबई- मुंबई (Mumbai) आणि महाराष्ट्र (Maharashtra) इतरांच्या भाकरीवर जगतात. स्वतःचे उद्योग, खाणी नाहीत, इतर राज्यातल्या उद्योजकांवर महाराष्ट्रात चालतो, असे विधान करून महाराष्ट्राविरोधात गरळ ओकणाऱ्या भाजपाचे (BJP) खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांच्या मालकीचा अलिशान फ्लॅट मुंबईत असल्याचे उघड झाले आहे.
खार पश्चिम येथील उच्चभ्रू झुलेलाल अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर दुबे यांचा फ्लॅट (Nishikant Dubey luxurious flat in Mumbai)आहे. ४०४ क्रमांकाचा हा फ्लॅट सध्या भाड्याने देण्यात आला आहे. २००९ साली दुबे यांनी निवडणूक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या फ्लॅटचा उल्लेख आहे. या १६८० चौरस फूट आकाराच्या फ्लॅटची किंमत तेव्हा सुमारे १ कोटी ६० लाख रुपये इतकी होती. आज त्याची बाजारभावानुसार किंमत दोन कोटींच्या पुढे गेल्याचा अंदाज आहे. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी १९९३ ते २००९ या काळात निशिकांत दुबे हे मुंबईतील एका नामांकित कॉर्पोरेट कंपनीच्या संचालक मंडळात कार्यरत होते. व्यवस्थापकीय संचालक पदावर त्यांनी काम केले होते. मुंबईत कोट्यवधींची मालमत्ता असूनही दुबे महाराष्ट्राविषयी अशी वादग्रस्त विधाने करत असल्याने त्यांच्या भूमिकेवर टीका होत आहे.
फक्त गरिबांनाच मारता
अंबानीना का बोलत नाही?
खासदार निशिकांत दुबे आज सिक्कीममध्ये म्हणाले, मी जे वक्तव्य केले होते, त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. माझे वक्तव्य अर्धवट दाखवण्यात आले. मी फक्त एवढेच म्हणालो होतो की, महाराष्ट्रात भरल्या जाणाऱ्या करामध्ये इतर राज्यांचाही वाटा आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय मुंबईत आहे, म्हणून संपूर्ण देशातून कर मुंबईत जमा होतो. त्यामुळे हे केवळ महाराष्ट्राचे योगदान नाही, हे सामूहिक आहे. भाषेच्या मुद्द्यावरून ठाकरे कुटुंब (Thackeray family) मारहाण करत असेल, तर ते आमच्या सहनशीलतेच्या पलीकडे आहे. इथे गरिबांना मारहाण केली जाते. पण मुकेश अंबानीसारख्या (mukesh ambani) श्रीमंतांवर कोणी काही बोलत नाही. माहीममध्ये मुस्लिमांची वस्ती आहे, तिथे हिंमत असेल तर जा. पण तुम्ही निवडक लोकांवरच का तुटून पडता? स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank of India) चेअरमन तेलगू भाषिक आहेत, एलआयसी (LIC)चे मुख्यालयही मुंबईत आहे. सिक्कीममधले नागरिक सुद्धा स्टेट बँकेत पैसे ठेवतात. मग हे सर्व केवळ मराठी माणसाचे योगदान कसे ठरू शकते?