Nitin Gadkari on EV: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari on EV) यांनी देशातील वाहन उद्योगासाठी एक मोठे आणि महत्त्वाचे भविष्यवेधी विधान केले आहे. आगामी 4 ते 6 महिन्यांत इलेक्ट्रिक वाहनांची (EVs) किंमत पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या अगदी बरोबरीची होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
FICCI उच्च शिक्षण शिखर परिषद 2025 (FICCI Higher Education Summit 2025) येथे बोलताना गडकरी यांनी हा विश्वास व्यक्त केला.
इंधनाची आयात आणि आर्थिक बोजा
भारत जीवाश्म इंधनाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. यामुळे देशावर दरवर्षी सुमारे 22 लाख कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडतो, शिवाय पर्यावरणाचीही हानी होते. त्यामुळे स्वच्छ ऊर्जा पर्यायांचा स्वीकार करणे, हे देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत गडकरी यांनी मांडले.
ऑटोमोबाइल उद्योगाचे मोठे उद्दिष्ट
मंत्री गडकरी यांनी यावेळी देशाच्या वाहन उद्योगाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. “पुढील पाच वर्षांत भारतीय ऑटोमोबाइल उद्योगाला जगात नंबर 1 बनवण्याचे आमचे लक्ष्य आहे,” असे त्यांनी सांगितले. परिवहन मंत्री म्हणून पदभार स्वीकारला तेव्हा भारतीय वाहन उद्योगाचा आकार 14 लाख कोटी रुपये होता. तो आता वाढून 22 लाख कोटी रुपये झाला आहे. सध्या जागतिक स्तरावर अमेरिकेच्या ऑटोमोबाइल उद्योगाचा आकार 78 लाख कोटी रुपये, चीनचा 47 लाख कोटी रुपये, तर भारताचा 22 लाख कोटी रुपये इतका आहे, असेही ते म्हणाले.
इतर महत्त्वपूर्ण घोषणा
गडकरी यांनी इतर महत्त्वाच्या योजना आणि बाबींवरही लक्ष वेधले. मक्यापासून इथेनॉल निर्मितीमुळे शेतकऱ्यांनी अतिरिक्त 45,000 कोटी रुपये कमावले आहेत. तसेच, 2027 पर्यंत देशातील विलग केलेला संपूर्ण घनकचरा (Segregated Solid Waste) रस्ते बांधणीसाठी वापरण्याचे आपले उद्दिष्ट आहे, ज्यामुळे कचऱ्यातूनही मूल्यनिर्मिती होईल.
उच्च शिक्षण संस्थांनी अभ्यासक्रमात यशस्वी अभिनव तंत्रज्ञानाचा समावेश करण्यावर आणि भविष्यातील नियोजनासाठी व्यावहारिक उपयोगावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
हे देखील वाचा – ‘आपल्या समाजात अशा कृत्यांना…’; सरन्यायाधीश गवई यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेवर मोदींची पहिली प्रतिक्रिया